..तर बापाचे नाव लावणार नाही, असे तावडेंना दिलेले चॅलेंज जितेंद्र आव्हाडांनी खरे केले

राजकारणात दुसऱ्याला कमी लेखू नये, असे सांगणारा हा प्रसंग
..तर बापाचे नाव लावणार नाही, असे तावडेंना दिलेले चॅलेंज जितेंद्र आव्हाडांनी खरे केले

पुणे : राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. विधीमंडळ अधिवेशनात विनोद तावडे यांनी दिलेले आव्हान राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी पूर्ण करून दाखवलं. या दोघांमध्ये एका मुद्यावरून विधानसभेत वाद झाला होता. या वादातून तावडे यांनी आव्हाड यांना चिमटा काढला. प्रत्यक्षात हा चिमटा काढणारे घरी बसले आणि आव्हाड पुन्हा सभागृहात आले.

मावळत्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात काही मुद्यावरून चर्चा सुरू असताना आव्हाड यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्यास प्रत्युत्तर देताना तावडे यांनी आव्हाडांना टोला लगावला होता.

``आव्हाडांना सर्व विषय मार्गी लागल्यावर बोलायचं सुचतं. ते पुन्हा विधानसभेत येतील की नाही, हे माहीत नाही. त्यामुळे त्यांना बोलु द्या, असे तावडे यांनी म्हणताच  आव्हाड चिडून जागेवरून उठले आणि मी माझ्या मतदारसंघात 75 हजार मतांनी विजयी नाही झालो तर बापाचे नाव सांगणार नाही. मी तावडेंसारखा दुसऱ्याच्या मतदारसंघात उभा राहत नाही. खासदार गोपाळ शेट्टींच्या जिवावर निवडून येणाऱ्यांनी माझ्याविषयी बोलू नये, असे जोरदार प्रत्युत्तर दिले होते. या दोघांतील वादात शेवटी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना हस्तक्षेप करावा लागला होता.

निवडणुका लागल्यानंतर सारे चित्र बदलले. आव्हाड सभागृहात येतील की नाही, अशी शंका घेणारे तावडे यांना भाजपने तिकिटच दिले नाही. ते निवडणुकीला सुद्धा उभे राहू शकले नाहीत. दुसरीकडे आव्हाड यांनी आपल्या मुंब्रा मतदारसंघात दणकेबाज विजय मिळवला.

मुंब्रा- कळवा मतदारसंघातून आव्हाड यांना 1 लाख 9 हजार 14 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधातील शिवसेनेच्या उमेदवार दीपाली सय्यद यांना 33 हजार 497 मते मिळाली. तावडे यांना 75 हजार मताधिक्याचे आव्हान देणारे आव्हाड हे 75 हजार 517 मतांनी विजयी झाले.

तावडे यांनी असेच आव्हान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिले होते. चव्हाण यांचा पराभव निश्चित असल्याने त्यांनी निवडणुकीला उभेच राहू नये, असा सल्ला देऊन तावडेंनी त्यांना डिवचले होते. तेव्हाही चव्हाणांनी तावडेंनी सल्ला देण्याची गरज नसल्याचे सांगत आपल्या स्वतःच्या मतदारसंघाचे त्यांनी पाहावे, असे उत्तर दिले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com