Jitendra Avhad - Anand Paranjape make NCP conference successful | Sarkarnama

नाराजांची कोंडी फोडून  आव्हाड - परांजपे जोडीने राष्ट्रवादीची सभा दणक्‍यात यशस्वी केली 

राजेश मोरे
मंगळवार, 15 जानेवारी 2019

जितेंद्र आव्हाड सर्वसमावेशक 

जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेश नेतृत्त्व आहेत. त्यांनी सातत्याने पक्षाचा विचार केला आहे. पक्षाच्यापुढे मैत्रीची अथवा इतर नात्यांचीही पर्वा केली नाही. त्यामूळेच ही सभा यशस्वी होईल याची आम्हांला खात्री होती.

-आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष

ठाणे :  राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यातील सभा काही नाराज नगरसेवकांनी केलेलेई कोंडी फोडून  जितेंद्र  आव्हाड - आनंद परांजपे जोडीने राष्ट्रवादीची सभा दणक्‍यात यशस्वी केली . 

गडकरी रंगायतन येथील राष्ट्रवादीची सभा होऊन दोन दिवस झाले असले तरी या सभेचे कवित्व अद्याप कायम आहे. विशेष म्हणजे पक्षातील काही पदाधिकाऱयांनी या सभेकडे पाठ फिरविल्यानंतरही या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. 

या सभेच्या निमित्ताने शहरातील सभेला केवळ शिवसेना अथवा मनसेच नाही तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्तेही नियोजनबद्ध गर्दी करु शकतात हे पाहावयास मिळाले.

गेल्या निवडणूकापासून सेंट्रल मैदानानंतर गडकरी रंगायतनचा चौक अथवा महापालिकेसमोरील रस्ता हा सभेसाठी महत्त्वाचा रस्ता ठरला आहे. पण या रस्त्यांची रुंदी जरी कमी असली तरी लांबी जास्त असल्याने येथे हजारोंच्या संख्येने गर्दी जमविण्यास यश न आल्यास राजकीय पक्षाची ताकद प्रामुख्याने समोरी येते.

त्यातही गेल्या काही दिवसापासून शहरातील राष्ट्रवादीत अंतर्गत धूसफूस सुरु आहे. महापालिकेतील अथवा पक्षाच्या इतर विषयामध्ये आपल्या विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करुन काही राष्ट्रवादीचे नगरसेवक पक्षाकडून अंतर राखू लागले आहेत. त्यातही त्यांचा प्रमुख रोष हा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर आहे. 

आव्हाड सध्या केवळ शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनाच झुकते माप देत असल्याचा या नाराज गटाचा प्रमुख आरोप आहे. पण त्याची जाहीर वाच्यता करणे या गटाकडून टाळले जात आहे. पण हा गट नाराज असल्याचे ठाण्यातील राष्ट्रवादीच्याच नाही तर इतर राजकीय पक्षांतील लोकांनाही माहिती आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी तर उघडपणे आव्हाड यांच्या विरोधात भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. त्यातूनच पक्षाची भूमिका कोणतीही असली तरी महापालिकेतील सभागृहात योग्य वाटेल तीच भूमिका ते मांडत असतात. त्यातही त्यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची नाराजी जाहीरपणे सामोरी आली होती.

 तसेच पक्षाच्या विविध कार्यक्रमात मुल्ला यांचा संक्रीय सहभाग हा पक्षाच्या जमेची बाजू होती. त्यांचे राबोडी परिसरात वर्चस्व असल्याने पक्षाच्या कार्यक्रमात या परिसरातील गर्दी ही जमेची बाजू होती. पण ही सभा होण्यापूर्वी मुल्ला यांनी आपण या सभेसाठी उपलब्ध नसल्याचे लेखी वरिष्ठ नेत्यांना कळविले होते. काही वैयक्तीक कार्यक्रमासाठी बाहेरगावी जात असल्याचे त्यांनी कळविले होते. 

त्यामूळे पक्षाची एवढी महत्त्वाची सभा असताना मुल्ला कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी जात असल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. त्याचवेळी पक्षातील एका ज्येष्ठ नगरसेवकाने देखील या सभेच्या सक्रीय सहभागापासून स्वतःला चार हात दूर ठेवल्याची चर्चा आहे. या नगरसेवकाने या सभेला हजेरी लावली असली तरी आपल्या प्रभागातील कार्यकर्ते या सभेला पोचण्यासाठी विशेष तजविज केली नसल्याचे कळते. 

पण त्यानंतरही जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या सभेला कळवा मुंब्राबरोबरच शहरातील कार्यकर्तेही वाजतगाजत सभेच्या ठिकाणी आल्याने काही ठराविक पदाधिकाऱयाच्या नाराजीमूळे पक्षाला फरक पडत नसल्याचा इशारा या निमित्ताने आव्हाड यांनी पक्षातील नाराजांना दिल्याचे मानले जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख