सातारा : कोरोनाबाधित व संशयितांच्या मृत्यूचे सत्र सातारा जिल्ह्यात सुरूच असून, आज एक कोरोनाबाधित व दोन संशयित अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित सापडण्यासोबतच त्यांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आज दिवसभरात सातारा जिल्ह्यातील 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 484 पर्यंत पोहोचला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित सापडण्याचे व बाधित आणि संशयितांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आजही बाधितांबरोबर मृतांचीही संख्या वाढली. मुंबईवरून कारी (ता. सातारा) येथे आलेल्या 54 वर्षीय पुरुषामध्ये कोरोनासदृश लक्षणे दिसू लागल्याने तीन दिवसांपूर्वी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 18 झाली आहे.
होळ (ता. फलटण) येथील 85 वर्षीय वृद्ध महिला "सारी'ने आजारी होती. काल (ता. 28) त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्युपूर्वी तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. तपासणीमध्ये तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत आज सायंकाळपर्यंत आठ जणांची भर पडली. त्यानंतर रात्री नऊ वाजता आलेल्या अहवालात आणखी 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये फलटण चार, माण तीन, पाटण चार, खटाव आठ, सातारा एक, वाई दोन, जावली दोन रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 484 झाली आहे.
सायंकाळी आलेल्या अहवालात चिंचणी (ता. खटाव) व पळशीतील (ता. खंडाळा) प्रत्येकी एक, पाटण तालुक्यातील नवसरवाडीमधील 53 वर्षीय महिला व ताम्हिणे येथील 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे. रात्री नऊच्या अहवालामध्ये फलटण तालुक्यातील वडले, जोरगाव, होळ (मृत वृद्ध महिला) व साखरवाडीतील प्रत्येकी एक, माण तालुक्यातील म्हसवड, दहिवडी व राणंदमधील प्रत्येकी एक, पाटण तालुक्यातील नवारस्तामधील एक, जांभेकरवाडी (मरळोशी) येथील दोन, आडदेवमधील एका रुग्णाचा त्यात समावेश आहे.
खटाव तालुक्यातील अंभेरीतील पाच, निमसोडमधील एक, कलेढोण येथील दोन, सातारा तालुक्यातील निगुडमाळ (ग्रामपंचायत परळी) येथील एक, वाई तालुक्यातील मुंगसेवाडीतील दोन, जावळी तालुक्यातील आंबेघरमधील दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या 86 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्याचबरोबर 257 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 24, कृष्णा हॉस्पिटलमधील 26, वाई ग्रामीण रुग्णालयातील 93, कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयातील 42, कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील 30 व शिरवळमधील कोरोना सेंटरमधील 42 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 484 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यापैकी 143 रुग्ण बरे झाले आहेत. 300 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
कऱ्हाडला कोरोनामुक्तीची शंभरी..
उपचार सुरू असताना 14 दिवसांनंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील नऊ जणांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. त्यामध्ये म्हासोली येथील तीन पुरुष, एक महिला व 12 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. इंदोलीतील पुरुष, भरेवाडी येथील पुरुष व महिला, तसेच मिरेवाडीमधील 23 वर्षांच्या युवकाचा समोवश आहे. या आठ जणांना घरी सोडल्याने कऱ्हाड तालुक्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 111 झाली आहे.

