नागपुरातील क्रीडांगणे शाबूत ठेवणार की नाही : आमदार विकास ठाकरे

क्रीडांगणे फक्त खेळ आणि क्रीडास्पर्धांसाठीच राखीव ठेवण्यात यावी, याकडे आमदार विकास ठाकरे यांनी मुंबई अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले
Mla Vikas Thakre Raised issue of Nagpur Play Grounds in Assembly
Mla Vikas Thakre Raised issue of Nagpur Play Grounds in Assembly

नागपूर : शहरातील क्रीडांगणांवर धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमच अधिक होतात. काही मैदानांची अवस्था डंपिंग यार्डसारखी झाली आहे. त्यामुळे खेळाडूंची अडचण होत आहे. क्रीडांगणे फक्त खेळ आणि क्रीडास्पर्धांसाठीच राखीव ठेवण्यात यावी, याकडे आमदार विकास ठाकरे यांनी मुंबई अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले.

''कस्तुरचंद पार्क हे नागपूर शहरातील ऐतिहासिक क्रीडांगण आहे. पूर्वी येथे वर्षभर खेळाडू विविध खेळ खेळायचे. फुटबॉल स्पर्धा व्हायच्या. आता मैदानाचा काही भाग मेट्रो रेल्वेला स्थानकासाठी देण्यात आला आहे. सध्या स्थानकाचे काम सुरू आहे. जागोजागी बांधकाम साहित्य पडले आहे. आगामी काळात हे मैदान खेळाडूंना मिळणार नाही. रेशीमबाग मैदानावर खेळापेक्षा आता प्रवचन व धार्मिक कार्यक्रमच अधिक होतात. वर्षभर येथे प्रदर्शन व प्रवचनासाठी शामियाने टाकलेच असतात. हे मैदान आता खेळाडूंसाठी शिल्लकच राहिलेले नाही.'' असे त्यांनी निदर्शनास आणले.

यशवंत स्टेडियममध्ये अधिवेशनातील आंदोलनांचे मंडप टाकले जातात. त्यानंतर तेथील साहित्य, खिळे व लाकडांचे तुकडे स्वतः खेळाडूना उचलून साफ करावे लागतात. कामठी रोडवरील इंदोरा मैदानात दुकानदारांनी रेती, विटा, इमारत बांधकाम साहित्यासाठी अतिक्रमण करून बळकावले आहे. कामठी रोडवरीलच ललीत कला ग्राउंड मैदानाकडे नागपूर सुधार प्रन्यासने दुर्लक्ष केले आहे. जागोजागी कचरा पडला असल्याने अवस्था डंपिंग यार्डसारखी झाली आहे. हे बघता शहरातील खेळांसाठी राखीव असलेली क्रीडांगणे फक्त खेळासाठीच उपलब्ध करून द्यावी, येथील अतिक्रमण हटवावे, या मैदानावर दिल्या जाणाऱ्या इतर कार्यक्रमांना परवानगी देऊ नये,'' अशी विनंती विकास ठाकरे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे केली.

करोडपतींवरही कारवाई करा

शहरातील अनेक मोकळया व डॉ. पंजाबराव कृषी विद्यापिठाच्या जागांवर शहरातील करोडपती लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. महापालिका आयुक्त लहानसहान लोकांवर कारवाई करून अतिक्रमण हटवित आहेत. त्यांनी करोडपतींच्या अतिक्रमणाकडेसुद्धा लक्ष द्यावे, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com