बिजवडी : महाराष्ट्र आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख विश्वस्त व महा एनजीओ
फेडरशेनचे संस्थापक शेखर मुंदडा हे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी इच्छुक आहेत. त्यांना कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळो याच्याविषयी आम्हाला काही देणे घेणे नाही. शेखर मुदंडा हे वारकरी असून त्यांच्या कुटुंबात अनेक दशकांची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वारकरी संप्रदायातली व्यक्ती शासन दरबारी गेल्यास वारकऱ्यांचे विविध प्रश्न मांडतील म्हणूनच संपूर्ण वारकरी संप्रदाय शेखर मुदंडा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल, असा विश्वास वारकरी संप्रदाय युवा मंचचे राज्याध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी व्यक्त केला आहे.
पंढरपूर येथे झालेल्या वारकरी संप्रदायाच्या बैठकीत ते बोलत होते. अक्षय महाराज भोसले यांनी पदवीधर मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार शेखर मुदंडा यांचा परिचय करून दिला. त्यांच्या वारकऱ्यांसाठी व सामाजिक कार्यासाठी केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला. यानंतर सर्व फड प्रमुखांनी शेखर मुदंडा यांना एकमुखी पाठींबा देण्याचे जाहीर केले.
अक्षय महाराज भोसले म्हणाले, वारकरी संप्रदाय हा पक्ष विरहित असून तो केवळ सेवा व सामाजिक कार्य करणाऱ्या निष्कलंक वारकरी व्यक्तींच्या मागे उभा असतो. शेखर मुंदडा यांच्या कुटुंबाची ७० वर्षांची वारी आहे तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील आर्ट ऑफ लिव्हिंगचे ते महाराष्ट्राचे प्रमुख विश्वस्त आहेत. महाएनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून कुठल्याही प्रसिध्दीची अपेक्षा न ठेवता १० लाखाहून अधिक कुटुंबासाठी ते कोरोना काळात मदतीस धावले. वारीच्या काळात वारकरी सेवा रथाच्या माध्यमातून लाखो वारकरी वर्गाची सेवा ते करत आहेत.
वारकरी संप्रदायातील सर्वच महाराज मंडळी व परंपरा यांचे अत्यंत निकटचे संबंध आहेत. अलीकडच्या दशकात वारकरी संप्रदायातीळ बहुतांश पिढी ही उच्च शिक्षित आहेत. महाराष्ट्रामधील लाखो वारकऱ्यांपैकी बहुतांश वारकरी हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. ही संख्या लाखोंच्या घरात आहे. अशा सर्व युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी आमचा एखादा प्रतिनिधी शासन दरबारी असणे गरजेचे आहे. आता पर्यंत प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वारकऱ्यांना जवळ केले.
मात्र जेव्हा संप्रदायाचे काही मुद्दे मांडणे गरजेचे असते तेव्हा कुठलाही प्रतिनिधी सहकार्य करत नाही ही मोठी खंत आहे. वारकरी संप्रदायाने त्यांना पाठिंबा दिला आहे. इतर सर्वपक्षीय उमेदवारांच्या तुलनेत मुंदडा यांचा चेहेरा नवीन आहे व ते तरुण आहेत, अत्यंत संयमी व अभ्यासु आहेत, व्यवस्थापन क्षेत्रात त्यांचा अनुभव दांडगा आहे. ह्या सर्वच गोष्टी शेखर मुंदडा यांच्या दृष्टीने सकारत्मक आहे.
यावेळी शेखर मुंदडा म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा वारकरी संप्रदाय पाठीशी असल्याने माझे मनोबल व कार्य करण्याचा उत्साह अधिक वृद्धिंगत झाला आहे. या आधीही संप्रदायाची सेवाच करत आहे व आता संधी भेटली तर खूप काही चांगल्या गोष्टी वारकरी व पदवीधर युवकांसाठी प्रामाणिकपणे करणार आहे. यावेळी रामकृष्ण महाराज वीर, भानुदास महाराज चार्तुमास्ये यांची मनोगते झाली. यावेळी इच्छुक उमेदवार शेखर मुंदडा यांनी वारकरी संप्रदायाचे जेष्ठ अभ्यासक श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर व पूज्य प्रसाद महाराज अमळनेरकर यांचे दर्शन घेतले.
यावेळी वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर, वारकरी फड परंपरेतील वासकर फडाचे प्रमुख राणा महाराज वासकर, देहूकर फडाचे प्रमुख संजय महाराज देहूकर (संत तुकाराम महाराजांचे वंशज), कराडकर दिंडीचे मालक गणेश महाराज कराडकर, नामदेव महाराज फडाचे प्रमुख विठ्ठल महाराज नामदास (संत नामदेव महाराजांचे वंशज), कबीर महाराज मठाचे प्रमुख रघुनाथ महाराज कबीर, भागवत महाराज कबीर, चातुर्मास्ये मठाचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज चार्तुमास्ये, दासगणू तथा रामदासी परंपरेचे पाईक समीहन महाराज आठवले, अलिबागकर फडासह इतर फडाचे प्रमुख उपस्थित होते.

