`भाजपच्या नगरसेवकांना पैशाचे आमिष दाखवले... पण कोणीही फुटला नाही` - our corporators were lured by money but no one defet claims bjp | Politics Marathi News - Sarkarnama

`भाजपच्या नगरसेवकांना पैशाचे आमिष दाखवले... पण कोणीही फुटला नाही`

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

शिवसेनेचा गटही विसर्जित 

देवरूख ः काहीही झाले तरी भाजपला धोबीपछाड द्यायचा म्हणून देवरुखात शिवसेनेने नगरपंचायतीमधील आपला गट विसर्जित केला खरा, चिठ्ठीवर कौल जाऊनही सेनेसह आघाडीच्या हाती धुपाटणे आले. यामुळे देवरूख नगरपंचायतीमधील शिवसेनेचे अधिकृत अस्तित्वच संपले. सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी आमच्या नगरसेवकांना पैशांचे आमिष दाखवण्यात आले; मात्र कोणीही फुटला नाही. अनेकांनी बरेच प्रयत्न केले; मात्र सत्यच जिंकले, असे भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यानी पत्रकारांना सांगितले.

मंगळवारी (ता. 6) झालेल्या देवरूख नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने आपला अधिकृत गट विसर्जित करून आघाडीच्या गटात सामील होणे पसंत केले. एवढे करूनही मनसेने ऐनवेळी तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे सभापती निवडीत भाजपचा वरचष्मा राहिला. यामुळे आता शिवसेनेतच अंतर्गत नाराजी वाढली.

विषय समिती सभापतिपदाच्या निवडीत सेनेने आघाडीच्या गटात सहभागी होत आघाडीचे संख्याबळ 9 असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात मनसेच्या नगरसेविकेने सेना या गटात सहभागी झाल्याने पक्ष धोरणानुसार आपण आघाडी गटातून बाहेर पडत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना आधीच दिले होते. तरीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ऐनवेळी संख्याबळ समान असल्याचे सांगत चिठ्ठीद्वारे कौल घेण्याचे आदेश दिले. यात भाजपचीच सरशी झाली. आरोग्य समितीवर एक सदस्य जादा असूनही या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष उपनगराध्यक्ष असल्याने याही ठिकाणी आघाडीच्या शून्य आले.

अस्तित्व स्वतःच्या हाताने संपवले
भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव म्हणाले, ""शेवटी सत्याचाच विजय झाला. पण यातून शिवसेनेने आपले अस्तित्व स्वतःच्या हाताने संपवून घेतले. त्यांना मत दिलेल्या मतदारांचा अपमान केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आधी संख्याबळानुसार सर्व काही होईल असे सांगतात नंतर मात्र सगळं सिद्ध होऊनही ऐनवेळी चिठ्ठीचा कौल घेतात. यासाठी मार्गदर्शन मागवतात. मुळात हे मार्गदर्शन त्यांच्या वरिष्ठांचे होते की राजकीय दबावाचे, याचा आम्ही शोध घेणार आहोत. ग्रामदेवता सत्याच्या बाजूने उभी राहिली. यात नुकसान शिवसेनेचे झाले आहे.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख