`सतेज पाटील यांच्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा जीव धोक्‍यात` - members of Gokul are in danger due to Satej Patil criticizes Pratap Patil | Politics Marathi News - Sarkarnama

`सतेज पाटील यांच्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा जीव धोक्‍यात`

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

गोकुळमधील सत्ताधाऱ्यांची पत्रके काढून पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका... 

कोल्हापूर : दूध उत्पादकांना कोरोनाची लागण होऊ दे किंवा त्यांचा जीव जाऊ दे; पण आम्ही सत्तेचा गैरवापर करून शेतकऱ्यांना वेठीस धरणार हेच "गोकुळ'च्या निवडणुकीत पालकमंत्र्यांनी दाखवून दिले आहे. आजवर "गोकुळ'मध्ये शेतकरी हिताचाच कारभार झाला, त्यामुळे संघ शेतकऱ्यांच्या मालकीचा करणार ही पालकमंत्र्यांची वल्गना थापेबाजी, ज्यांना उत्पादकांच्या जीवाशी खेळताना काही वाटत ते कसले पालक, त्यांचे उत्पादकांबद्दलचे प्रेम पुतणा-मावशीचे असल्याची टीका सत्तारूढ आघाडीचे उमेदवार प्रताप पाटील-कावणेकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

कोरोनामुळे राज्यातील 45 हजार संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या; पण विरोधी आघाडीतील मंत्र्यांनी गोकुळच्या सभासदांना या संकटात ढकलून निवडणुकीचा अट्टहास केला. पालकमंत्र्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळेच शाहूवाडी व शिरोळ तालुक्‍यातील ठरावदारांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात जवळपास 50 ते 60 ठरावदार बाधित आहेत. जिल्ह्यात संचारबंदी असताना मंत्री, खासदार, आमदार सभा-मेळावे घेत आहेत. त्यामुळे स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा जीव धोक्‍यात घालणाऱ्या पालकमंत्र्यांना हे पाप फेडता येणार नाही.

कोरोनाची बिघडलेली स्थिती शासनाने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली तर निवडणूक स्थगित ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून गोकुळच्या मलईसाठी पालकमंत्री सुडाचे राजकारण करत आहेत. कोरोनामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत, रेमडिसिव्हर इंजेक्‍शन, बेड मिळत नाहीत, कोरोना नियंत्रणात आणण्यात पालकमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. केवळ वैयक्तीक राजकीय असुरी महत्वकांक्षा यातून पालकमंत्र्यांनी ही निवडणूक लादली पण त्यांना सुज्ञ शेतकरी धडा शिकवतील, असा टोलाही या पत्रकात लगावण्यात आला आहे.

धूर्त आणि पाताळयंत्री लोकांच्या हातात "गोकुळ' नको : अरुण नरके

जिल्ह्यातील लाखो उत्पादकांच्या पाठिंब्याने आणि इतक्‍या वर्षाच्या तपश्‍चर्येतून निर्माण झालेल्या "गोकुळ'ला काही जण राजकीय अड्डा बनवू पाहत आहेत. विश्‍वास आणि अनुभव नसलेल्या माणसांच्या हातात सायकलसुद्धा चालवायला आपण देत नाही, ज्यांचे काम संस्था बंद पाडणे एवढेच आहे अशा धूर्त आणि पाताळयंत्री लोकांच्या हातात दूध उत्पादकांचे भविष्य देणे चुकीचे आहे, असे पत्रक संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी प्रसिद्धीला दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे. आज विरोधकांकडून खोटे-नाटे आरोप करत भ्रम निर्माण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोकुळवर जे आरोप केले जातात ते ऐकीव आहेत; पण गोकुळमुळे निर्माण झालेली समृद्धी आपण सर्वजण पाहत आहोत, अनुभवत आहोत. लाखो शेतकरी गोकुळचे लाभार्थी आहेत. विरोधकांच्या आरोपात जरा जरी तथ्य असते तर सर्वसामान्य दूध उत्पादकांचे वैभव उभे राहू शकले असते का? हा प्रश्‍न अगोदर विरोधकांनी स्वतःला विचारावा, असा टोलाही लगावला आहे.

पाच हजार लिटर क्षमतेचा हा संघ आमदार पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्त्वाखाली 20 लाख लिटर क्षमतेचा झाला आहे. पशुधन खरेदीपासून ते संगोपनापर्यंत प्रोत्साहन, प्रशिक्षण, अनुदान यासह गोठ्यापर्यंत आरोग्यसेवा मिळू लागल्या. सरकारी नियमांपेक्षा अधिक म्हणजे उत्पन्नातील 82 टक्के परतावा दूध उत्पादकाला मिळू लागला. राज्यातील सर्वाधिक दूध दरासोबत 3, 13 व 23 तारखेला बीले मिळू लागली. त्यातून संसाराला हातभार लागला. कितीतरी जणांच्या आयुष्याची घडी नीट झाली. या सगळ्याचा जिल्ह्यातील भूमिपुत्राला अभिमान आहे. पारदर्शक, उत्पादकांना केंद्रबिंदू मानून कारभार करत यशाचा आलेख चढता ठेवण्यासाठी मुळात नेतृत्त्वाची नियत साफ असावी लागते आणि ती आमच्याकडे आहे. इतर संघासमोरही "गोकुळ' आदर्श आहे. व्यावसायिक डावपेचातून बाजारपेठा काबिज करता येतात पण "गोकुळ'ने लोकांचा विश्‍वास जिंकत मन काबीज केले आहे. कोल्हापुरच्या दुधाला मागणी केवळ चवीसाठी नाही तर उत्पादकाच्या सचोटीवर ग्राहकांचा विश्‍वास आहे, त्याला खात्री आहे की या दुधात भेसळ नाही आणि कोल्हापुरचा दूध उत्पादक कधीही भेसळ करणार नाही करू देणार नाही, असा विश्‍वासही या पत्रकात व्यक्त करण्यात आला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख