क्रांतिकारकांच्या जिल्ह्यात कामाची संधी आनंददायी : IPS आंचल दलाल - Enjoyable job opportunities in the district of revolutionaries Says IPS Aanchal Dalal | Politics Marathi News - Sarkarnama

क्रांतिकारकांच्या जिल्ह्यात कामाची संधी आनंददायी : IPS आंचल दलाल

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील जनतेत नैसर्गिकरित्या कायद्याचे पालन करण्याची जाणीव आहे. कायदा- सुव्यवस्था राखण्यात नागरीक पोलिसांना सहकार्य करतात. कायद्यासोबतच न्याय व्यवस्थेवर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. कायद्याच्या चाकोरीत वावरण्यात येथील नागरीकांचा कल आहे. ही बाब पूर्वेकडील इतर राज्यांत जाणवत नाही.

सातारा : ऐतिहासिक व क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यात काम करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. येथील नागरीक शांतता प्रिय असून कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलिसांना चांगल्या प्रकारे मदत करतात. त्यामुळे मी साताऱ्यात अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकणार आहे, असा विश्वास सातारच्या नुतन सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी व्यक्त केला. 

साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बहिण असलेल्या आंचल दलाल यांनी नुकताच सातार उपविभागाचा पदभार स्वीकारला आहे. यानिमित्त त्यांच्याशी  साधलेला संवाद..... 

प्रश्न : तुमचे बंधू सध्या सातारचे जिल्हाधिकारी आहेत. आयपीएस होण्यासाठी त्यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळाले का?

आंचल दलाल : आयपीएसच्या परिक्षेसाठी मला माझ्या भावाची खूप मदत झाली. सर्वात जास्त माहिती जनरल नॉलेजची माहिती त्यांच्याकडून मिळाली. तसेच मुलाखतीसाठी कोणता अभ्यास करायचा, कोणती माहिती असायला हवी हे त्यांनीच सांगितले होते. माझे सर्व शिक्षण ऍकॅडमीत झालेले आहे. तसेच कोलकत्ता येथील राष्ट्रीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतलेली आहे. त्यामुळे लोकांना न्याय देणे आणि गुन्हेगारांना रोखण्यासाठी माझ्या शिक्षणाचा उपयोग होईल, या उद्देशाने मी आयपीएस केडर निवडले. याक्षेत्रातच मी अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकते. 

प्रश्न : आयपीएस प्रशिक्षणादरम्यान, तुम्हाला उत्कृष्ट महिला अधिकारी हा पुरस्कार मिळालेला आहे, याविषयी थोडे सांगा.... 

आंचल दलाल : शालेय जीवनापासून मला क्रिडा क्षेत्राची खुप आवड आहे. मी बास्केटबॉल, बॅडमिंटनची खेळाडू असून यामध्ये मी माझे कौशल्य सिध्द केलेले आहे. त्यामुळे आयपीएसच्या प्रशिक्षणादरम्यान, लांबपल्याची पोहण्याची स्पर्धा आणि घोडेस्वारीमध्ये उत्कृष्ठ काम केल्याने मला पुरस्कार मिळाला. याच धर्तीवर मला उत्कृष्ठ महिला अधिकारी पुरस्कारही मिळालेला आहे. 

प्रश्न : तुम्ही आयपीएससाठी महाराष्ट्र केडर का निवडले? 
आंचल दलाल : देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील जनतेत नैसर्गिकरित्या कायद्याचे पालन करण्याची जाणीव आहे. कायदा- सुव्यवस्था राखण्यात नागरीक पोलिसांना सहकार्य करतात. कायद्यासोबतच न्याय व्यवस्थेवर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. कायद्याच्या चाकोरीत वावरण्यात येथील नागरीकांचा कल आहे. ही बाब पूर्वेकडील राज्यात जाणवत नाही. सातारा ऐतिहासिक व क्रांतीकारकांचा जिल्हा आहे. त्यामुळे सातारा शहरात काम करणे आनंददायी आहे. 

प्रश्न : स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या युवक, युवतींना काय सांगाल.. 
आंचल दलाल : आयएएस परिक्षा म्हणजे मॅरेथॉनसारखी आहे. या स्पर्धेसाठी अभ्यासात सातत्य पाहिजे. तुमची कष्ट करण्याची तयारी असल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता. स्मार्ट ऍण्ड हार्ड वर्कची आवश्‍यकता आहे. 

पुस्तके उपलब्ध करणार.... 
सातारा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात स्पर्धा परीक्षेशी संबंधित भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत. ही पुस्तके मी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवक, युवतींसाठी उपलब्ध करू शकते. त्यासाठी त्यांनी आमच्या कार्यालयात येऊन पुस्तकांची मागणी करावी. मी त्यांना ही पुस्तके उपलब्ध करून देईन, असेही आंचल दलाल यांनी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख