पक्षविरोधी कारवाया सगळ्याच पक्षात, पण राष्ट्रवादी याला लगाम घालणार - जयप्रकाश दांडेगावकर

पक्षविरोधी कारवाया सगळ्याच पक्षात, पण राष्ट्रवादी याला लगाम घालणार - जयप्रकाश दांडेगावकर

औरंगाबाद : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यातील सगळ्याच पक्षात पक्षविरोधी कारवायांचे पेव फुटले होते, एकट्या राष्ट्रवादीत हे घडले असे नाही. शिस्तपालन समिती स्थापन करण्याचा मुळ उद्देशच अशा प्रकारांना आळा घालणे हा आहे. त्यामुळे ज्यांनी कुणी पक्षासोबत आहोत असे दाखवून निवडणुकीत विरोधात काम केले, त्यांना समज देणे, पक्षांतर्गत वाद टाळणे आणि सगळ्यांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करणे हे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण काम करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून मोठ्या प्रमाणात आजी-माजी नेते, विद्यमान आमदार बाहेर पडले. शिवाय अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील पक्षविरोधात काम केल्याचे स्पष्ट झाले होते. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले होते. पक्षाने या संदर्भात आता ठोस पावले उचलत शिस्तपालन समितीची स्थापना केली आहे. माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगांवकर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. 

पक्षाने घालून दिलेली संहिता व नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने बाराजणांचा समावेश या समितीत करण्यात आला असून पक्षविरोधी कारवाई करण्याऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी सरकारनामा प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले, तालुका आणि जिल्हा पातळीवर पक्षातंर्गत वाद असतात ते समन्वयाने सोडवून पक्ष एकसंध ठेवणे हे या समितीचे प्रमुख काम असणार आहे. अर्थात समजावून सांगितल्यानंतरही एखादा पदाधिकारी, कार्यकर्ता ऐकत नसेल तर त्याच्यावर कठोर कारवाई देखील केली जाईल. 

शिस्तपालन समिती स्थापन करण्याची आताच गरज का? वाटली असा प्रश्‍न साहजिकच पडू शकतो. पण पक्षविरोधी कारवायांचे लोण हे केवळ आमच्या पक्षापुरते मर्यादित नव्हते, तर त्याची लागण सगळ्याच राजकीय पक्षांना झाली होती. राष्ट्रवादीत हे प्रमाण अधिक होते आणि त्यामुळे भविष्यात अशा लोकांवर बारकाईने नजर ठेवली जाईल. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अनेकांनी पक्षासोबत असल्याचे दाखवत विरोधात काम केले हे प्राथमिक पाहणीत लक्षात आले आहे. अशा सगळ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बोलावून याबद्दल जाब विचारला जाणार आहे. तसेच त्यांच्या अशा वागण्यामागची भूमिका काय? हे देखील समितीचा अध्यक्ष म्हणून मी व आमचे इतर सदस्य समजून घेतील. कुणावरही एकतर्फी अन्याय केला जाणार नाही असे देखील दांडेगावकर यांनी स्पष्ट केले. 

कारवाईचे अधिकार, पण निर्णय वरिष्ठांना विचारूनच.. 
शिस्तपालन समितीला पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. पण संबंधिताला चूक सुधारण्याची संधी देऊनही तो तसाच वागत असेल तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा अधिकार समितीला आहे. पण पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करून याबाबतीत निर्णय घेतले जातील असेही दांडेगावकरांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com