जयंतराव आणि संभाजी पवारांत पुन्हा युद्ध पेटले!

सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकीवरून पुन्हा एकदा पालकमंत्री जयंत पाटील आणि माजी आमदार संभाजी पवार यांच्यातील राजकीय युध्दाला प्रारंभ झाला आहे. भाजप-शिवसेनेच्या गत सत्ताकाळात पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी निर्माण करीत सर्वोदयच्या कायदेशील लढाई जिंकण्याच्या दिशेने जोरदार आगेकुच केली होती. त्याला राज्यातील सत्तापालट होताच जयंतरावांनी ब्रेक लावला आहे. त्यामुळे हा वाद आता रस्त्यावर येण्याची शक्‍यता आहे.
jayant-patil-sambaji-pawar
jayant-patil-sambaji-pawar

सांगली : महाराष्ट्राच्या राजकारणात राजारामबापू आणि वसंतदादा पाटील यांच्यातील राजकीय वाद सर्वज्ञात. या दोघांनाही राज्यभर अनेक कार्यकर्ते घडवले. राजारामबापूंनी घडवलेल्या कार्यकर्त्यांपैकी एक असलेल्या संभाजी पवार यांनी बापूंच्या पश्‍चात सांगलीत राजकीय भुकंप घडवत वसंतदादा घराण्याचा चार वेळा पराभव केला. त्याकाळात पवार आणि जयंतरावांचा दोस्ताना राज्यभर चर्चेत असायचा. आता तोच दोस्ताना सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकीवरून शत्रुत्वात रुपांतर झाला आहे. गेली आठ वर्षे हा वाद धुमसत आहे.

सर्वोदयची उभारणी आणि त्यानंतर तो आर्थिक गर्तेत सापडल्यानंतर तो कारखाना चालवण्यासाठी घेत राजारामबापू कारखान्याने घेतलेला ताबा हा सारा प्रवास मोठ्या राजकीय आणि न्यायालयीन लढाईचा भाग झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर पवार यांना मोठा दिलासा मिळाला. जयंतराव यांच्याविरोधात वाळवे तालुक्‍यात मोठी राजकीय आघाडी उघडण्यात आली. या लढाईत गेली पाच वर्षे जयंतराव बॅक फुटवर गेले होते. सर्वोदय साखर कारखान्याचे नामकरण राजारामबापू असे करताना तसा बदल साता बारा उताऱ्यांवरही झाला होता. त्यामागे जसा राज्यातील सत्तेचा हात होता.

तोच कित्ता वापरत संभाजी पवार यांनी फडणवीस यांच्या सत्ताकाळात सात बारा उताऱ्यांवर सर्वोदयचे नाव लावले होते. मात्र पुन्हा एकदा बाजी पलटली असून राज्यातील सत्तात्तरानंतर साता बारा उताऱ्यावर नाव चढवण्याची प्रक्रिया नियम डावलून झाल्याचा आक्षेप नोंदवत जयंतरावांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागत पुन्हा एकदा राजारामबापू कारखान्याचे नाव चढवले आहे. यात कोण बरोबर कोण चूक याचा फैसला यथावकाश न्यायालयातच होईल मात्र त्याआधी राजकीय युद्ध पेटले आहे. 

सोमवारी संभाजी पवार यांनी पत्रकार परिषद घेत जयंतरावांवर प्रहार केला. ते म्हणाले,"राज्यात सत्तेत येताच जयंत पाटील यांनी सत्याचा गळा घोटून स्वार्थी राजकारण सुरू केले आहे. सर्वोदय साखर कारखान्याचे सातबारा उतारे सत्तेच्या जोरावर त्यांनी बदलून घेतले आहेत. शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत येथील उपजिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारात नसताना तसे आदेश दिले. त्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दाद मागूच, शिवाय न्यायालयात लढा देऊ. वेळ पडली तर रस्त्यावर उतरून जयंतरावांच्या या कूटनीतीला उत्तर देण्याची आमची तयारी आहे.'' 

पवार यांच्या या वक्‍तव्याचा समाचार घेताना जयंतरावांचे समर्थक व राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर.पाटील यांनीही जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. आमची संघर्षाची तयारी आहे असा इशाराच त्यांनी दिला आहे. ते म्हणाले," याबाबत 23 जानेवारी 2020 रोजी अंतिम सूनावणी होवून 24 जानेवारी 2020 रोजी आमचे अपील मान्य करुन न्यायालयीन व प्रशासकीय प्रक्रियेतून राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे नाव सात बारा उताऱ्याला लागले आहे. माजी आमदार संभाजी पवार यांनीच सत्तेचा दूरपयोग केला आहे.'' यानिमित्ताने खडाखडी झाली असून राजकीय युध्दाला पुन्हा एकदा प्रारंभ झाला आहे. त्याचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणात उमटणार आहेत.     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com