जयकुमार रावलांच्या जबाबदारीत रोहयो, पर्यटन खात्यातील कामगिरीमुळे वाढ

राज्याचे रोहयो आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याचाही अतिरिक्त भार सोपवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) सुखद धक्का दिला. या निर्णयानंतर दोंडाईचा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) आणि धुळे शहरात समर्थकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
जयकुमार रावलांच्या जबाबदारीत रोहयो, पर्यटन खात्यातील कामगिरीमुळे वाढ

धुळे : राज्याचे रोहयो आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याचाही अतिरिक्त भार सोपवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) सुखद धक्का दिला. या निर्णयानंतर दोंडाईचा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) आणि धुळे शहरात समर्थकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

रोहयो आणि पर्यटन खात्यातील उत्तम कामगिरीची दखल घेत, कार्यावर विश्‍वास व्यक्त करत मंत्री रावल यांच्या जबाबदारीत वाढ करण्यात आली. पुण्यातील भाजपचे नेते गिरीश बापट हे खासदार झाल्याने मंत्री रावल यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याचाही अतिरिक्त भार देण्यात आला आहे. 

`रोहयो'तील कामगिरी 
`रोहयो'अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या माध्यमातून राज्यात रोजगार आणि जलसिंचनाची अनेक महत्त्वपूर्ण कामे करणारे आणि चेतक, ऑरेंज फेस्टिवलसारखे पर्यटकांना भुरळ घालणारे उपक्रम मंत्री रावल यांनी राबविले. त्यांच्या नेतृत्वात चार वर्षात या विभागाने ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. वि. स. पागेंनंतर प्रथमच राज्यात शेती, रोजगार, सिंचन, वृक्षलागवडीच्या क्षेत्रात भरीव कार्य केले गेले आहे. तसेच जलयुक्त शिवार व शेततळे योजनांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. यात 2017- 2018 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील चार पुरस्कार महाराष्ट्र राज्याला प्राप्त झाले. 

पर्यटनाला चालना 
पर्यटनवृद्धीसाठीही जयकुमार रावल यांनी अनेक नवनवे उपक्रम राबवले. राज्यातल्या प्रत्येक विभागात एक याप्रमाणे सहा विभागात सहा राज्यस्तरीय फेस्टिवल सुरू करण्याची संकल्पना मंत्री रावल यांचीच आहे. मुंबईत एलिफंटा फेस्टिवल, नागपूरमध्ये ऑरेंज फेस्टिवल, औरंगाबादचा अजंता फेस्टिवल, सारंगखेड्याचा चेतक फेस्टीवल या धर्तीवर त्या- त्या भागातील ओळख असलेले फेस्टिवल सुरू केले. ऑरेंज फेस्टिवलमुळे नागपूरची संत्री सातासमुद्रापार पोहचली. चेतक फेस्टिवलमुळे जगभरातले अश्वप्रेमी सारंगखेडा (जि. नंदुरबार) येथे येऊ लागले. 

अजंता आणि एलिफंटा फेस्टिवल जगभरातील पर्यटकांच्या पसंतीला उतरला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात हजारो पर्यटक या शहरांना भेटी देत असल्याचे समोर आले आहे. विभाग स्तरावर मनोरंजन फेस्टिवल सुरू करून त्यांना स्वतंत्र निधी देण्याचा निर्णय झाल्याने राज्याच्या पर्यटन वृद्धीबरोबरच पर्यटनदृष्ट्या ब्रॅंडिंग आणि स्थानिकांसाठी रोजगारनिर्मिती होत आहे. मंत्री रावल यांच्या कारकिर्दीत किल्ल्यांची डागडुजी, दुरुस्तीचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे. 

राज्यातील समुद्र किनारे, गडकिल्ले, नाशिकची पैठणी- वाइन, विदर्भातील जंगल टुरिझम, कोकणातले समुद्रकिनारे, योग टुरिझम, वाइन टुरिझम, हेरिटेज टुरिझम, कल्चरल टुरिझमच्या संकल्पना घेऊन मंत्री रावल हे महाराष्ट्रातील पर्यटन जगासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

रावलांना समर्थ साथ 
राज्यात टुरिझम इकॉनॉमी उभी करण्यासाठी झटणारे मंत्री रावल हे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच चेतक फेस्टिवलला जगमान्यता मिळाली आहे. रावल संस्थान, उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्या समृद्ध सामाजिक जीवनाचा वारसा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रेरणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समर्थ साथ यामुळे मंत्री रावल यांची राजकीय कारकीर्द उभारी घेत आहे. 

कर्तृत्वातून आमदारकीची हॅटट्रिक 
मंत्री रावल 2004 च्या विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरले. यात पश्‍चिम खानदेशात पहिल्यांदाच भाजपचे आमदार होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. 2009 मध्ये शिंदखेड्यातून दुसऱ्यांदा आमदार झाले. पुढील निवडणुकीतून म्हणजे 2014 मध्ये आमदार झाल्यावर रावल यांना उत्तुंग कार्यकर्तृत्वामुळे मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यांच्या रूपाने जिल्ह्यामधील 15 वर्षांतील मंत्रिपदाचा "बॅकलॉग' भाजपने भरून काढला. 

मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयात बारावी, पुण्यातील प्रसिद्ध सिंबायोसिस महाविद्यालयात वाणिज्य शाखेची, ब्रिटनमधून "एमबीए'ची पदवी घेऊनही रावल शिंदखेडा तालुका, जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी झटत आहेत. ऐश्‍वर्य, आर्थिक सुबत्ता, नोकरीच्या संधी सोडून जनसेवेत समरस झाले आहेत. "एमबीए'ची पदवी घेत असताना रावल यांनी कार्डिफ विद्यापीठ प्रतिनिधीपदाची निवडणूक लढविली. त्यात ते विजयी झाले. त्यांचे बोलके कार्यच मंत्रिपदाच्या रूपाने यशोशिखरावर नेणारे ठरले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com