नाशिकच्या पालकमंत्रिपदी जयकुमार रावल यांच्या नावाची चर्चा

नाशिकच्या पालकमंत्रिपदी जयकुमार रावल यांच्या नावाची चर्चा

नाशिक ः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मंत्रिमंडळात फेरबदल करताना इच्छुकांची नाराजी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे सरकारचे नियोजन आहे.

त्याचबरोबर मंत्र्यांकडील अतिरिक्त जबाबदारीदेखील काढून घेतली जाणार असून, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना संघटनेच्या कामात अधिकाधिक लक्ष देता यावे म्हणून पर्यटन, तसेच अन्न व नागरी पुरवठामंत्री जयकुमार रावल यांच्याकडे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवली जाण्याची चर्चा भाजपमध्ये सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने त्यादृष्टीने विरोधी पक्षांसह सरकारने हालचाली गतिमान केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल करताना पालकमंत्र्यांकडील कार्यभारातदेखील बदल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकसह जळगाव जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जळगाव जिल्हा महाजन यांचे होमपीच आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांना शह देण्यासाठी महाजन यांच्याकडे जळगावची धुरा सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. श्री. महाजन यांच्याकडे दोन विभागांच्या कारभारासह नाशिक व जळगाव या दोन जिल्ह्यांचा कारभार असल्याने कामाची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा कार्यभार काढून जयकुमार रावल यांच्याकडे देण्याची चर्चा सुरू आहे.

महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी त्यांनी नाशिकच्या विकासकामांत फारसा रस दाखविला नाही. जिल्हा नियोजनाच्या बैठका वेळेत होत नसल्याने अनेक प्रश्‍न प्रलंबित राहिल्याच्या तक्रारी आहेत. पालकमंत्री असूनही नाशिकचे प्रश्‍न मंत्रालय पातळीवर न सुटल्याने आमदारांमध्येदेखील महाजन यांच्याबाबत नाराजी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिककडे संपूर्ण लक्ष देणारा पालकमंत्री हवा, असा सूर युतीसह विरोधी आमदारांनी लावला आहे. 

जलसंपदामंत्री महाजन यांच्याकडे जलसंपदा विभागाबरोबरच वैद्यकीय शिक्षणमंत्रिपदाचा कार्यभार गेल्या तीन वर्षांपासून आहे. महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोअर कमिटीतील असून, महापालिका, नगरपालिका तसेच लोकसभा निवडणुकीतही त्यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी दिली होती. नगर व सोलापूर जिल्ह्यात महाजन यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला भगदाड पाडले. उत्तर महाराष्ट्रातील भाजप, शिवसेनेच्या आठही जागा निवडून आणण्याचे श्रेय महाजन यांना दिले जाते. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय गणिते मांडण्यासाठी महाजन यांच्याकडचा अतिरिक्त कार्यभार कमी करून संघटनेच्या कामात त्यांना अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com