सर्वात बेईमान म्हणून रामराजेंचे नाव इतिहासात येईल : जयकुमार गोरे

आमदार गोरेंनी काल आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज आपली पुढील राजकीय भूमीकामांडली. त्याच्यासमवेत सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशिल कदम, अरूण गोरे, भीमराव पाटील यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
Jaykumar Gore - Ramraje Nimbalkar
Jaykumar Gore - Ramraje Nimbalkar

सातारा  : ''दुष्काळी जनतेच्या प्रश्‍नासाठी आपण भाजप मध्ये प्रवेश करत असून उद्या (रविवारी) सोलापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत माझा प्रवेश होणार आहे. कॉंग्रेसमधील काहींना माझी अडचण वाटत होती, ती मी या प्रवेशातून दूर केली असून त्यांनी आता मोकळा श्‍वास घ्यावा. साताऱ्याच्या राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी सर्वात बेईमान माणूस म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांचे नावे लिहिलं जाईल," अशी टिका माजी आमदार जयकुमार गोरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. 

आमदार गोरेंनी काल आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज आपली पुढील राजकीय भूमीका मांडली. त्याच्यासमवेत सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशिल कदम, अरूण गोरे, भीमराव पाटील यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. 

आमदार गोरे म्हणाले, ''गेल्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकालात मी दुष्काळी जनतेच्या प्रश्‍नाला प्राधान्य दिले. 87 गावांत पाणी पोचविण्याचा प्रयत्न केला. येथील जनतेने ज्या अपेक्षेने निवडून दिले, त्या जनतेचे स्वप्नपूर्तीचे कर्तव्य पूर्ण केले आहे. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द मी पाळला आणि आमचे मित्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडुन आणले. त्याबदल्यात मुख्यमंत्र्यांनी 32 गावांना पाणी देण्याचा निर्णय अवघ्या चार दिवसात घेतला. कालच या योजनेच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळल्यामुळे मी काल राजीनामा दिला.''

ते पुढे म्हणाले, ''कॉंग्रेसमध्ये इमानेइतबारे काम करताना अनेक चांगले, वाईट लोक भेटले. कॉंग्रेस बळकट करताना राष्ट्रवादीला विरोध केला. आता मुख्यमंत्र्यांनी माझ्या पाठीशी ताकद उभी केली आहे. उद्या (रविवारी) मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे. कॉंग्रेस पक्षाला मी बळ देण्याचे काम केले या कालावधीत अनेकसहकारी मला मिळाले. ते ही माझ्या लढाईत सहभागी असतील. किरण बर्गे, भिमराव पाटील, धैर्यशिल कदम, अरूण गोरे, आदी माझ्यासोबत आजही आहेत. कॉंग्रेस पक्षात होतकरू, प्रामाणिक तसेच जनाधार असलेल्या कार्यकर्त्यांना ताकद देताना नेते कचरतात. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. पण मी कुठेही गेलो तरी या सर्वांच्या पाठीशी मी राहणार आहे.''

''पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत एकलव्याप्रमाणे काम केले. आता कॉंग्रेसमधील उरलेल्यांना व बाबांना माझ्या शुभेच्छा. कॉंग्रेस पक्षातील काही प्रवृत्तींनी चिमणराव कदम, शंकरराव जगताप, विलासराव पाटील-उंडाळकर यासारख्या नेत्यांना संपविण्याचे काम केले, असा आरोप ही जयकुमार गोरेंनी केला. मतदारसंघातून तुम्हाला सर्वच पातळीवरून विरोध होत आहे, या प्रश्‍नावर गोरे म्हणाले, सध्याची माझ्याविरोधातील एकजूट हे बारामतीचे टार्गेट आहे. अशी अनेक टार्गेट मी उडविली आहेत. आत जे विरोधात गेलेत त्यातील 70 ते 80 टक्के नेते निवडणुकीत माझ्या व्यासपीठावर दिसतील. यातील आर्धीनिम्मी मीच त्यांच्याकडे पाठविली आहेत.'' शेखर गोरेंविषयी बोलताना म्हणाले, आमच्या बंधूंचे टायमिंग नेहमीच चुकत आले आहे . आता  ही चुकलं. पण तरीही बंधूंना पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा राहतील. माझ्यासोबत आता जी मंडळी आहेत, त्यांचा निर्णय माझ्या प्रवेशानंतर आम्ही एकत्र बसून करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. 

रामराजेंनी मला संपविण्याचा प्रयत्न केला, पण रावणाने सीतेपायी लंका जाळून बसला, तसे गोरेच्या नादी लागून त्यांचेच अस्तित्व संपत चालले आहे. आता त्यांना कटोरा घेऊन पक्षांची दारात फिरावे लागत आहे. आता नवीन शासन निर्णय आला आहे. इथं केले ते इथेच फेडायचे आहे. त्यामुळे या व्यक्तीचा नंबर त्यातही वरचा आहे, अशी टिका जयकुमार गोरेंनी केली. 

माझ्या डिएनएमध्ये कॉंग्रेस आहे, असे तुम्ही म्हणत होता. आता पक्ष सोडल्यावर तुम्हाला दु:ख होतंय, आनंद होतोय की पश्‍चाताप होतो, यावर जयकुमार म्हणाले, मतदारसंघातील जनतेचे दु:ख संपविण्यासाठी मी हा त्याग केला आहे. त्यामुळे येथे डीएनए महत्वाचा नाही जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्‍न महत्वाचा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com