जयदत्त क्षीरसागरांच्या पराभवाचे खापर समर्थकांनी भाजपवर फोडले !

जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या डॉ. प्रितम मुंडे यांचे ताकदीने काम केले. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्यासाठी पंकजा मुंडेंनी एक सभाही घेतली होती.
pankaja-tai-Jaydattaa-anna
pankaja-tai-Jaydattaa-anna

बीड: बीड विधानसभेत जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव भाजपमुळेच झाल्याचे खापर शिवसेना पदाधिकारी आणि क्षीरसागर समर्थकांनी फोडले आहे. भाजपने काम केले नाही, आपण त्यांना ताकत दिली, पण त्यांनी विरोधात काम केले, असा उघड आरोपही समर्थकांनी केला.

राष्ट्रवादीत घुसमट होत असल्याचा थेट आरोप करत लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. प्रितम मुंडे यांचा ताकदीने प्रचार केल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर  सुरुवातीला भाजपच्या काही नेत्यांनी क्षीरसागरांविरोधात मेळावे/बैठका घेतल्या होत्या. परंतु, नंतर मात्र पंकजा मुंडे यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी सभा घेतली आणि मग भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या प्रचारात सहभाग घेतला. 


दरम्यान, निवडणुकीत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घ्यावी असे जयदत्त क्षीरसागर यांचे नियोजन आणि प्रयत्न होते. परंतु, भाजप नेत्यांनी त्यांना त्यापासून रोखल्याचीही माहिती आहे. यानंतर जयदत्त क्षीरसागर यांचा पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडून काठावर पराभव झाला. 


पराभवाच्या दोनच दिवसांनी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून धीर दिला होता. आता सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा गुरुवारी जयदत्त क्षीरसागर यांनी समर्थकांसह शिवसैनिकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांच्या समर्थकांनी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पराभवाचे खापर भाजपवर फोडले आहे. 


'आपण भाजपला ताकत दिली, भाजपच्या नेत्यांची कामे केली, पण त्यांनी आपल्याला मदत करण्याऐवजी विरोधकांना मदत केली, कुपाटिनेच शेत खाल्ले, निवडणुकी नंतर जयदत्त क्षीरसागर पालकमंत्री होतील असा प्रचार विरोधकांनी केला, आणि त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांनी आपल्याला मतदान केले नाही. 

 जसं सत्तेत केलं, तसच जयदत्त क्षीरसागरांच्या बाबतीत केलं. शेवटच्या रात्री विरोधात काम केलं. मात्र आता विश्वासघात करणारे सत्तेच्या बाहेर आहेत. जयदत्त क्षीरसागर संवैधानिक पदावर असोत नसोत, तेच विकास करु शकतात , त्यांच्या पाठिशी कार्यकर्ते खंबीरपणे उभे आहेत' असेही कार्यकर्ते म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com