क्षीरसागर डावपेच म्हणून दोन पावले मागे आले पण ... 

पंकजा मुंडे यांच्या मदतीशिवाय बीडमध्ये विजयाचे गणित अवघड असल्याची जाणिव जयदत्त क्षीरसागर यांना आहे. म्हणूनच प्रत्येक कार्यक्रमांच्या डिजीटलवर त्यांचे फोटो प्रसिद्ध केले जात आहेत.
pankaja Munde Jaydatta Khirsagar
pankaja Munde Jaydatta Khirsagar

बीड : आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाचे गणित जुळवायचे असेल पंकजा मुंडे यांची मदत आवश्यक असल्याची जाणीव जयदत्त क्षीरसागर यांना आहे. त्यामुळे त्यांनी ‘दोन पावले मागे’ असे धोरण स्विकारले आहे. पण, क्षीरसागर जशी कच खात आहेत तसे भाजपवाले त्यांच्या अंगावर जात असल्याचे चित्र आहे. 

विधानसभा निवडणूक सुरळीत पार पडून पुन्हा आमदार होईपर्यंत पंकजा मुंडे किंवा त्यांच्या समर्थकांना प्रत्युत्तर द्यायचे नाही असा जयदत्त क्षीरसागरांचा पावित्रा दिसतोय.  पंकजा मुंडे यांच्या मदतीशिवाय बीडमध्ये विजयाचे गणित अवघड असल्याची जाणिव जयदत्त क्षीरसागर यांना आहे. म्हणूनच क्षीरसागरांच्या प्रत्येक  कार्यक्रमांच्या डिजीटल होर्डिंग आणि बॅनरवर त्यांचे फोटो प्रसिद्ध केले जात आहेत.

पुर्वी जिल्ह्यातून राष्ट्रवादीकडून एकमेवर जयदत्त क्षीरसागर विजयी झाले. इतर भाजप आमदारांइतकाच विकास निधीत त्यांना वाटा असे. पण, जिल्ह्यात कुठलीही गोष्ट मंजूर झाली, विकास निधी आला तर त्याचे क्रेडीट पालकमंत्री असल्याने सहाजिचक एकमेव पंकजा मुंडे यांनाच असे. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि मंत्रीपद मिळविले. त्यामुळे आता काही गोष्टींच्या मंजूरीचे क्रेडीट क्षीरसागरांच्याही वाट्याला जाऊ लागले.

सुरुवातीलाच वॉटरग्रीड मध्ये बीड जिल्ह्याचा समावेश झाल्यानंतर यात श्रेयाचे वाटेकरी होण्याचा क्षीरसागरांनी प्रयत्न केला. त्यावर भाजप समर्थकांनी जोरदार हल्ला चढविला. अगदी 'दीड  दिवसांत आणि कोल्ह ऊसात 'अशा कोपरखळ्यां मारल्या गेल्या . शिवाय  याचे परिणाम विधानसभेला भोगावे लागतील, असे इशारेही दिले गेले . त्यानंतर काळाची पावले ओळखत योग्य वेळी योग्य गोष्टी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या क्षीरसागरांनीही दोन पावले मागे घेतली . 

पण, त्यांनी माघार घेतली तरी भाजपवाले अंगावर जाण्याचे बंद करण्याचे नाव घेत नाहीत. चारच दिवसांपूर्वी पंकजा  मुंडेंनी मंजूर करुन आणलेल्या कामांवर क्षीरसागर - मेटेंनी आयत्या रेघोट्या ओढू नयेत, फुकटचे श्रेय घेऊ नये असे पत्रक भाजप जिल्हाध्यक्षांनीच काढले. 

त्यानंतरही काल क्षीरसागर बंधूंच्या पुढाकाराने बीडमध्ये झालेल्या विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत कार्यक्रमांच्या सर्व डिजीटलवर पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रितम मुंडे यांचे फोटो छापले गेले. क्षीरसागर इतकी पावले मागे घेत असतानाही लगेच बीडमध्ये पंकजा मुंडे ठरवतील तोच आमदार असे पत्रक पुन्हा निघाले. एकूणच क्षीरसागर एकेक पाऊल मागे घेत आहेत पण भाजपवाले अंगावर जायचे थांबत नाहीत.  

याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटणार का हे महत्वाचे ठरेल. जयदत्त क्षीरसागरांना घराण्याचे पिढ्यान पिढ्यांचे संबंध , शिक्षण संस्था , साखर कारखाना , मंत्री अशा माध्यमातून लोकांची  केलेली कामे  या सर्व कारणांनी बीड जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात कमी जास्त  मानणारा मतदार  आहे.

सर्व पक्षात त्यांचे नेटवर्किंग आहे. त्यामुळे त्यांचेही उपद्रव मूल्य आहे . शिवाय जयदत्त क्षीरसागर संयमाने आणि चिकाटीने किल्ला लढविण्यासाठी प्रसिद्ध आहेत . त्यामुळे पुन्हा जम  बसल्यावर सुद्धा ते वचपा काढू शकतात असा आजवरचा अनुभव आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com