भाऊंच्या कार्यकर्त्यांबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत राहीन :  जयश्रीताई  पाटील  - Jayashri Patil makes an emotional appeal to congress workers | Politics Marathi News - Sarkarnama

भाऊंच्या कार्यकर्त्यांबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत राहीन :  जयश्रीताई  पाटील 

घनश्याम नवाथे
रविवार, 27 जानेवारी 2019

वाद मिटवून घ्या
वहिदा नायकवडी म्हणाल्या, "मी स्पष्टच बोलते. जयश्री पाटील, प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांनी एकत्र बसवून वाद मिटवून घ्यावा. विजय बंगल्यात किंवा साई बंगल्यात बसून निर्णय घ्या. वाद मिटला तर ठीक नाही, तर कॉंग्रेस पक्ष जो आदेश देईल तो पाळला जाईल.'' 

सांगली  : " मदनभाऊंच्या कार्यकर्त्यांबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत राहीन.  भाऊंच्या पश्‍चात तुमच्या जीवावरच मी राजकारणात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाकडे मी उमेदवारी मागेन. पक्ष जो निर्णय देईल तो मान्य केला जाईल. कॉंग्रेस पक्ष नक्कीच माझ्या उमेदवारीचा विचार करेल", असा विश्‍वास श्रीमती जयश्री पाटील यांनी विष्णूअण्णा भवन येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व्यक्त केला.

मदन पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जयश्री पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा निर्धार नुकताच करून त्यांना निर्णय सांगितला होता. या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांची मते आजमावण्यासाठी विष्णूअण्णा भवनमध्ये बैठक बोलावली होती. मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असल्याने तिचे मेळाव्यात रूपांतर झाले. नरसगोंडा पाटील, माजी महापौर किशोर जामदार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मालन मोहिते, माजी महापौर कांचन कांबळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमती पाटील म्हणाल्या, "मदनभाऊंच्या पश्‍चात तुमच्या जीवावरच मी राजकारणात आहे. मदनभाऊ कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे होते. कार्यकर्तेही त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत होते. आज तुमचे मत आजमावण्यासाठी बैठक घेतली. भाऊंच्या कार्यकर्त्यांबरोबर शेवटचा श्‍वास असेपर्यंत राहीन. न डगमगता . "

"संकट आले तरी भाऊंचा स्वाभिमान जपला जाईल. भाऊ हे संघर्षातून तयार झालेले नेते होते. जे संघर्षातून येते तेच टिकते. विधानसभेसाठी आपण उमेदवारी मागूया. पक्ष नक्कीच विचार करेल. पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल. विधानसभेपूर्वी लोकसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार निवडून आणू.''

श्री. जामदार म्हणाले, "सांगली हा दादांचा आणि कॉंग्रेसचा जिल्हा करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.''

नरसगोंडा पाटील म्हणाले, "प्रतीक पाटील हे लोकसभा मतदारसंघात सध्या फिरत आहेत. त्यामुळे आमदारकी आम्हाला का नको म्हणून हक्काने भांडत आहोत.''

माजी महापौर हारून शिकलगार म्हणाले, "भाजपने ज्याप्रमाणे बूथ सक्षम केले, त्याप्रमाणे बूथनिहाय कमिट्या कराव्यात.''

या वेळी वहिदा नायकवडी, करीम मेस्त्री, सुभाष खोत, अमित पारेकर, अजित सूर्यवंशी, रत्नाकर नांगरे, सुनील गाडे, डॉ. नामदेव कस्तुरे, उत्तम पाटील, प्रवीण खोत, अनिल डुबल आदींनी मनोगत व्यक्त केले. माजी महापौर किशोर शहा यांनी स्वागत केले. प्रा. सिकंदर जमादार यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक संतोष पाटील यांनी आभार मानले.

मदन पाटील यांच्या निधनानंतर प्रथमच बोलावलेल्या बैठकीसाठी बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक मंगेश चव्हाण, उमेश पाटील, रोहिणी पाटील, अभिजित भोसले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे भवन फुलले होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख