जयंत पाटील  मोहोळ यांच्याकडे पाहत म्हणाले, महापुरातील लोक कोथरूडला पोचले !

कोल्हापुरात आलेल्या महापुरातील लोक कोथरूडला पोचले. त्यांनी येथे येऊन स्थानिकांना अन्याय केला. परंतु येथील लोकांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले.
patil-mohol-jayantrao
patil-mohol-jayantrao


वारजे माळवाडी : कोल्हापुरात आलेल्या महापुरातील लोक कोथरूडला पोचले. त्यांनी येथे येऊन स्थानिकांना अन्याय केला. परंतु येथील लोकांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले. अन आपल्यावर अन्याय झाला हे दाखवून न देता तो सहन करणे यालाच विवेकवाद म्हणतात, असे राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हंटले. व्यासपीठावर बसलेल्या महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पहात श्री. पाटील हे बोलले यामुळे सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. 


कोथरूड येथील साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे आयोजित १९ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे  उद्घाटन आज राज्याचे अर्थमंत्री नामदार जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. 


 "समाजात वावरत असताना 'विवेक' अस्तित्वात आहे की नाही. हा प्रश्न मला पडतो. साहित्य आणि कलेची जेथे जोपासना होते तिथे विवेक नांदतो. राजकारणी साहित्य आणि कलेचा आदर करणार नाहीत, तोपर्यंत समाजात विवेक रूजणार नाही," असे मत राज्याचे अर्थमंत्री  नामदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.


यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित या दोन दिवसीय संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर या संमेलनाचे अध्यक्ष  संत साहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत आणि लेखक डॉ.रामचंद्र देखणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल,  साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष  दिलीप बराटे, रमेश गरवारे ट्रस्टचे संचालक डॉ.राजपाठक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संमेलनाच्या स्मरणिकेचे आणि डॉ. राजेंद्र थोरात लिखित 'वारकरी संतदर्शन' या पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले. 


यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी राजकीय कोट्या करीत कोपरखळ्या मारल्या. ते म्हणालेे की, मागील पाच वर्षात कोणत्याच साहित्य संमेलनाला आम्ही निमंत्रित नव्हतो. परंतु, आता आमंत्रणे यायला लागली आहेत आणि दिलीपभाऊ बराटे हे आमचेच असल्याने या निमंत्रणाचा स्वीकार केला. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे हे या संमेलनाचे अध्यक्ष असून त्यांचा भारुडाचा कार्यक्रम आम्ही अनेकदा अनुभवला आहे. परंतु, आता विधानसभेच्या विरोधी बाकावरून भारूड सादर केले जाते आणि आम्हाला त्याचे साक्षीदार व्हावे लागते. 

यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष  दिलीप बराटे यांनी केले. सूत्रसंचालन  साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे सचिव वि.दा. पिंगळे यांनी केले.  साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी आभार मानले. 

संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी जातीय आणि धार्मिक सलोख्यासाठी सर्वधर्मीय एकता ग्रंथ दिंडी काढण्यात आली. कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सर्व धर्मांच्या ग्रंथांचे पूजन करून दिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीत या संमेलनाचे अध्यक्ष  डॉ. रामचंद्र देखणे, अनेक मान्यवर साहित्यिक-कलावंत आणि टाळ- मृदुंगासह असंख्य वारकरी सहभागी झाले होते.  तत्पूर्वी या संमेलनानिमित्त आयोजित चित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन  प्रसिद्ध चित्रकार  रविमुकुल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com