माझा नाद करू नका; जयंत पाटलांचे फडणवीसांना चॅलेंज! 

माझा नाद करू नका; जयंत पाटलांचे फडणवीसांना चॅलेंज! 

सांगली : मला आव्हान सारे देणारे दमलेत, आता माझ्या नादाला लागू नका, असा टोला राष्ट्रवादीचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हाणला. 

इस्लामपूर येथे शनिवारी मुख्यमंत्र्यांनी जयंतरावांचे विरोधक माजी आमदार संभाजी पवार, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील या साऱ्यांसोबत स्वतंत्रपणे चर्चा केली. "हुतात्मा'चा प्रकल्प रोखणाऱ्यांना पापाचे फळ मिळेल, असाही टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला होता. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जयंतरावांविरुद्ध हा चक्रव्यूह रचला जात असल्याचे स्पष्ट संकेत या कार्यक्रमातून दिले गेले. त्या पार्श्‍वभूमीवर आज येथे एका कार्यक्रमावेळी जयंतरावांना विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी टोलेबाजी केली. 

ते म्हणाले,"हुतात्मा कारखान्याने कुठला प्रस्ताव दिला होता, हेच मला माहिती नाही. चांगल्या कामात आडवे यायचे, हे मी कधीच केलेले नाही. शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळावेत, यासाठी कारखान्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, या मताची मी आहे. हुतात्माचे आणि माझे नाते कदाचित मुख्यमंत्र्यांना माहिती नसावे. पुढची गोष्ट म्हणजे, ते पाप कुणाचे आणि ते कुणाबद्दल बोलले, हे मलाही कळालेले नाही.'' 

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले,""राज्यात शिवसेना हा सर्वांत दिशाहीन पक्ष आहे. त्यांचे मंत्री प्रस्तावांवर सह्या करतात आणि नेते गावभर सरकारच्या नावाने ओरडत फिरतात. त्यांना सत्ता सोडायची नाही आणि सोडली तर त्या ठिकाणी कोण बसेल, याचीही चिंता वाटते. राष्ट्रवादी हा शंभर टक्के भाजपचा विरोधी पक्ष आहे आणि तो तसाच राहील. शिवसेनेला काय करायचे आहे, हे त्यांनी ठरवायला हवे. त्यांना जनतेच्या प्रश्‍नापेक्षा सत्तेत अधिक स्वारस्य आहे.'' 

शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर श्री. पाटील म्हणाले,"वसंतदादांनीच शरद पवार यांच्या हाती राज्याची सूत्रे दिली होती. त्यामुळेच विष्णुअण्णा असतील किंवा अन्य नेते त्यांच्यासोबत आले. आता तो विषय काढून लोकांमध्ये मतभेद निर्माण करण्याचे काम ठाकरे करताहेत.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com