Jayant Patil Camping in Constituency | Sarkarnama

जयंत पाटलांचा मतदार संघात ठिय्या

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 जून 2019

गेली तीसहुन अधिक वर्षे आमदार जयंत पाटील यांनी मतदारसंघात आपले वर्चस्व टिकवले आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या माध्यमातून ते राज्याचे नेतृत्व करत आहेत. अर्थ-गृह-ग्रामविकास या खात्यांच्या मंत्रीपदाच्या माध्यमातून यापूर्वीही ते सक्रिय होतेच, परंतु यावेळची स्थिती वेगळी आहे.

इस्लामपूर : लोकसभा निवडणुकीच्या धांदलीनंतरही स्वस्थ न बसता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी जवळपास निम्मा इस्लामपूर मतदारसंघ पिंजून काढला आहे. गावागावात जात प्रभागनिहाय बैठका घेऊन लोकांचे प्रश्न जाणून घेण्याचा थेट संवादाचा कार्यक्रम त्यांनी राबविला. येत्या साडेतीन-चार महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारसंघात लगेचच कामाला सुरुवात केली आहे.

गेली तीसहुन अधिक वर्षे आमदार जयंत पाटील यांनी मतदारसंघात आपले वर्चस्व टिकवले आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या माध्यमातून ते राज्याचे नेतृत्व करत आहेत. अर्थ-गृह-ग्रामविकास या खात्यांच्या मंत्रीपदाच्या माध्यमातून यापूर्वीही ते सक्रिय होतेच, परंतु यावेळची स्थिती वेगळी आहे. भाजप-सेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्याची जबाबदारी पक्षाचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे असेल आणि त्यासाठी त्यांना तितका वेळ द्यावा लागेल. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या तयारीच्या अनुषंगाने राजकिय हालचाली गतिमान होतील आणि त्यात जयंतरावांची भूमिका मध्यवर्ती असेल. हे ओळखून लोकसभा निवडणूक प्रचार संपताच ते लगोलग सक्रिय झाले आणि त्यांनी गेल्या काही दिवसात जवळपास 25 गावांमध्ये सुमारे 125 हुन अधिक बैठका घेतल्या. इस्लामपूर मतदारसंघात वाळवा तालुक्‍यातील 48 आणि मिरज तालुक्‍यातील 8 गावांचा समावेश आहे. जवळपास पावणे तीन लाख मतदार आहेत.

लोकसभा मतदारसंघाचा आवाका, जबाबदारी आणि प्रचाराच्या मर्यादा विचारात घेता त्यांना सर्वांपर्यंत पोचता आले नव्हते, ही उणीव त्यांनी भरून काढली. गावागावात जाऊन बूथ कमिट्याची सद्यस्थिती जाणून घेतली. भाषणबाजीला फाटा देत लोकांचे प्रश्न जाणून घेण्यावर भर दिला. गावागावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रेशनधान्य दुकानांमध्ये न मिळणारे धान्य, शिधापत्रिका, पाणंद रस्त्यांचे प्रश्न यासह अनेक समस्या जाणून घेतल्या. स्थानिक पातळीवरील समस्यांना सरकारचे धोरण कसे जबाबदार आहे, हे अगदी थोडक्‍यात सांगून 'माझ्यावर आता राज्याची जबाबदारी आहे, आजवर तुम्ही मला नेतृत्वाची संधी दिली, त्याला मी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी सांगितले.'

मंत्रिपद असतांना जयंत पाटील यांच्याकडे लोकांचा जो ओघ होता, तो पद नाही म्हणून थांबला नाही. कामावर काही मर्यादा जरूर आल्या पण लोकांशी असणाऱ्या संपर्कात त्यांनी सातत्य ठेवल्याने त्यांच्या या संपर्कदौऱ्यात तितकाच चांगला प्रतिसाद त्यांना मिळत असल्याचे दिसून आले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख