महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जयंत पाटील यांनी केला भूखंड घोटाळ्याचा आरोप

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भूखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले असून बिल्डर हिताचे निर्णय घेणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आज केली.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जयंत पाटील यांनी केला भूखंड घोटाळ्याचा आरोप

मुंबई :  महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भूखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले असून बिल्डर हिताचे निर्णय घेणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आज केली. 

'पुण्यातील मौजे बालेवाडी येथे खेळाच्या मैदानासाठी एक भूखंड राखीव होता. शिवप्रिया रिअ‍ॅलिटर्सचे उमेश वाणी यांनी खेळाच्या मैदानाची ही जागा हडप करून आपली असल्याची दाखवली. या जागेवर प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावही मंजूर करून घेतला. मात्र याबाबत तक्रार झाल्यानंतर भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड यांनी ही जमीन खेळाच्या मैदानासाठी राखीव असल्याचे आणि मोजणीत आपली चूक झाल्याचे मान्य केले. तेव्हा महसूल अधिकाऱ्यांनी शिवप्रिया रिअॅलिटर्सच्या प्रकल्पाला स्थगिती दिली. मात्र महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही जमीन शिवप्रिया रिअॅलिटर्स असल्याचा निकाल दिला. त्या जमिनीवर 300 कोटीची प्रकल्प बिल्डरने उभी केला आहे,' असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील यांनी पुण्यातीलच भूखंड घोटाळ्याचे दुसरे प्रकरणही समोर आणलं आहे.पुण्यातील हवेली तालुक्यातील मौजे केसनंद येथील २३ एकर म्हातोबा देवस्थानची इनामी जमीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल छुगेरा प्रॉपर्टीज लिमिटेड यांना खरेदी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. महसूलमंत्र्यांच्या सहमतीने हवेली तालुक्यातील हा भूखंड विकला गेला. या व्यवहारात शासनाला मिळणारा नजराणा स्वरुपातील ४२ कोटी रुपयांचा महसूल बुडाला असल्याचा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे. सर्व कायद्याचे उल्लंघन करून महसूल मंत्र्यांनी हा निकाल दिला असून २३ एकर जमीनीची किंमत २५० ते ३०० कोटीच्या घरात आहे, असा जयंत पाटील यांचा दावा आहे.

जयंत पाटील यांनी विधानसभेत हे आरोप केल्यानंतर स्वतः महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यास आक्षेप घेतला. अर्ध न्यायिक अधिकारात आपण हे निर्णय घेतले असून त्यावर विधानसभेत आरोप करता येत नाहीत, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. भाजपाच्या आमदारांनीही याप्रकरणी गोंधळ घालत हे आरोप कामकाजातून काढून टाकावेत अशी मागणी केली. या मागणीनुसार विधानसभा अध्यक्षांनी हे आरोप कामकाजातून काढून टाकले. त्यामुळे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रांसह हे आरोप आपण करत असल्याचे सांगितले. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आणि एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जयंत पाटील यांनी केलीय. आपल्याकडे अजून एक भूखंड घोटाळ्याचे प्रकरण असून ते आपण उद्या उघड करू असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com