बलात्काऱ्यांचे मॉब लिंचिंग करा - जया बच्चन

अशा प्रकारचे गुन्हे काही देशांत होतात तेव्हा जनताच त्या गुन्हेगारांचा न्याय करते. मला माहिती आहे मी थोडे कठोर बोलते आहे; पण माझ्या मते अशा लोकांना झुंडीच्या ताब्यात द्यायला हवे व त्यांना "लिंच' करायला हवे.'' - जया बच्चन, सपा खासदार
बलात्काऱ्यांचे मॉब लिंचिंग करा - जया बच्चन

नवी दिल्ली : हैदराबादमध्ये महिला डॉक्‍टर निर्भयावर बलात्कार करून तिची अमानुष हत्या करणाऱ्या नराधमांना झुंडीच्या ताब्यातच दिले पाहिजे, असे सपा खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत संतप्तपणे सांगितले. मॉब लिंचिंग या शब्दाला अलीकडे धर्मांध टोळ्यांमुळे वेगळा अर्थ आल्याने, या निर्भयावर अत्याचार करणाऱ्यांचे "लिंचींग' केले पाहिजे अशी भावना बच्चन यांनी थेट व्यक्त करताच सभापती वेंकय्या नायडू यांच्यासह सभागृह क्षणभरासाठी अवाक झाल्याचे दिसले. बलात्कार व हत्या यासारखे निर्घृण कृत्य करणाऱ्यांना शासन करण्यासाठी दृढ राजकीय इच्छाशक्ती दाखवणे उपयुक्त ठरू शकते, अशा कानपिचक्‍या नायडू यांनी शासनकर्त्यांना दिल्या. 

हैदराबादच्या घटनेनंतर संतप्त असलेल्या जनभावनेचे प्रतीबिंब संसदेत आज उमटले. राज्यसभेत आज कामकाजच्या सुरवातीलाच हैदराबादमधील माणुसकीला काळे फासणाऱ्या गटनेचा निषेध करण्यात आला. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी चर्चेला प्रारंभ केला त्यात सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र भावना मांडल्या. बलात्काराची प्रवृत्ती घातक असल्याबाबत जनजागृती करावी इथपासून, दोषींना त्वरित फाशी देण्याच्या शिक्षेचे कायदे अत्यंत कडक करा अशी मागणी अनेक खासदारांनी केली. अण्णाद्रमुकच्या विदुला सत्यनाथ यांनी दाटून आलेल्या कंठाने,"" या देशात आमच्या मुलीही सुरक्षीत नाहीत काय ?"" असे विचारतानाच, ""या खुनी बलात्काऱ्यांना 31 डिसेंबरआधी फासावर चढवा,'' अशी मागणी केली. 

सभापती वेंकय्या नायडू म्हणाले की यासारख्या अमानवीय घटनेतील निर्दयी गुन्हेगारांच्या वयाचे काही देणे घेणे नाही. अनेकांना वाटते की हे आरोपी अल्पवयीन आहेत. पण जो असे दुष्कृत्य थंड डोक्‍याने करतो त्याला अतयंत कडक शासन करताना त्याच्या वयाशी का संबंध जोडावा. यावर अनेक खासदारांनी बाके वाजवून नायडूंच्या भूमिकेला पाठिंबा दिला. नायडू म्हणाले की बलात्कार व नंतर हत्या यासारखे अत्यंत दुष्ट कृत्य रोखण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती उपयुक्त ठरू शकते. फास्ट ट्रॅक न्यायालयात जरी त्यांना शिक्षा केली तरी आरोपी शिक्षेपासून कालहरण करत वाचत जातात. फास्ट ट्रॅक निर्णयानंतर अपील करण्याची प्रक्रिया इतकी कालहरण करणारी आहे की सारे काही संपून जाते. राज्य सरकार, केंद्र सरकार, गृह मंत्रालय व नंतर राष्ट्रपती इतक्‍या ठिकाणी दया मागण्याची सूट मिळते. अशा नराधमांवर अशी दया करावी का ? 
राजनाथ सिंह म्हणाले की ही अमानवीय घटना असून त्याबाबत संसदेत सर्वसंमतीने कठोर कायदा करण्यास सरकार तयार आहे. 
सदस्यांचे समाधान करण्यात सरकारला अपयश 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा झारखंडच्या प्रचारात गर्क असल्याने आज दिल्लीत नव्हते मात्र लोकसभेत, सरकारतर्फे सदस्यांच्या तोफखान्याला सामोरे जाताना संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी, अशा गुन्ह्याच्या आरोपींना फाशी देण्याचा कायदा सभागृहात सर्वसंमती असेल तर अत्यंत कडक करण्यास सरकार तयार आहे असे सांगितले. मात्र त्यांच्या या छापील उत्तराने सदस्यांचे अजिबात समाधान झाले नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com