कट्टर विरोधक राजेंद्र जासूदांचा पाचर्णेंना पाठींबा, लवकरच भाजपत प्रवेश

कट्टर विरोधक राजेंद्र जासूदांचा पाचर्णेंना पाठींबा, लवकरच भाजपत प्रवेश

शिक्रापूर : शिरुर पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासूद यांनी आज राष्ट्रवादीचा तडकाफडकी राजीनामा देत भाजपाचे आमदार बाबुराव पाचर्णे यांना पाठींबा जाहिर केला.

विशेष म्हणजे आमदार पाचर्णे यांचे पुत्र राहूल पाचर्णे यांचा दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद निवडणूकीत पराभव केलेले जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे यांना निवडून आणण्यासाठीची सर्व सूत्रे जासूद यांनीच हाताळल्याने पाचर्णेंचे कट्टर विरोधक समजले जाणा-या जासूदांचा पाचर्णे यांच्यासाठीचा राजिनामा येवू घातलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी शिरुरमध्ये मोठा परिणामकारक ठरणारा आहे.

शिरुर तालुक्यातील चर्चेतील नेते राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांचेनंतर माजी सभापती राजेंद्र जासूद यांचेकडे पाहिले जाते. मुळ करडे गावचे असलेले जासूद यांचा करडे, चव्हाणवाडी, लंघेवाडी तसेच रांजणगाव भागातील काही गाव व वाड्यावस्त्यांवर चांगलाच प्रभाव आहे.

याच त्यांच्या प्रभावाने त्यांनी सर्व सुत्रे हातात घेवून आमदार बाबुराव पाचर्णे यांचे पुत्र राहूल पाचर्णे यांना दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद निवडणूकीत पराभूत करुन त्यांचे मित्र राजेंद्र जगदाळे यांना जिल्हा परिषदेत पाठविले आहे. बांदल, जासूद, जगदाळे तसेच आंबेगाव-शिरुर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांची मैत्रीही जगजाहिर आहे. याच पार्श्वभूमिवर जासूद यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देण्याचा निर्णय हा तालुक्यासाठी मोठी राजकीय घडामोड असून त्यांनी आपला पाठींबा पाचर्णे यांना जाहिर केल्याने भाजपा व पाचर्णे यांचेसाठी हा निर्णय मोठ्या लाभाचा ठरणार हे नक्की.

दरम्यान श्री जासूद यांचा राजिनामा व पाचर्णेंना पाठींब्याचे पत्र आज दिवसभर सोशल मिडीयात फिरत राहिल्याने तालुक्यात राजकीय धुम्मस चालू राहिली. याच पार्श्वभूमिवर श्री जासूद यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, राजकारणात काही निर्णय घ्यावेच लागतात तसा हा निर्णय मी घेतला असून या निर्णयासाठी खासदार संजय काकडे, आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सूचना केली.

याबाबत खरेदी-विक्री संघाचे संचालक आबा सोनवणे यांनी सांगितले की, जासूद यांच्या भाजपला दिलेल्या पाठींब्याने तालुक्यातील राष्ट्रवादी आणखी खिळखिळी झालेली असून पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या पक्षांतरानंतर जासूद यांचे पक्षांतर म्हणजे पाचर्णे हे आता विक्रमी मताधिक्याच्या दिशेने निघाले आहेत.

खासदार संजय काकडे, आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या सुचनेनुसार लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात आपण प्रवेश करीत असून भाजपा नेतृत्व सांगेल तसा राजकीय प्रवास आपण करणार असल्याचे श्री जासूद यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com