धनगर मेळाव्यात जानकरांच्या भाषणात व्यत्यय! 

धनगर मेळाव्यात जानकरांच्या भाषणात व्यत्यय! 

नागपूर : धनगर आरक्षणाच्या मुद्यावर आज नागपुरात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना लोकांच्या असंतोषाला सामोरे जावे लागले. लोकांच्या विरोध पाहून जानकर यांना भाषणाचा "टोन' बदलावा लागला. 

भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर आरक्षण निर्णायक मेळावा नागपुरात आयोजित केला होता. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या मेळाव्याला पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, प्रा. राम शिंदे, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या मेळाव्यात महादेव जानकर यांचेही भाषण झाले. या मेळाव्याला राज्यभरातून धनगर बांधव आले होते. 

यावेळी बोलताना जानकर यांनी लोकांनी संयम ठेवावा, असे आवाहन केले. महादेव जानकर यांनी भाषणात संयमावरच भर दिला होता. राज्य सरकारला केवळ तीनच वर्षे झाली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर विश्‍वास ठेवा. तेच आपल्याला आश्‍वासन देतील, असे संयमी भाषण सुरू होते. आरक्षणासाठी लोकांनी संयम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केल्याबरोबर श्रोत्यांमधून प्रतिक्रिया उमटल्या. 
"संयम नाही, आरक्षण पाहिजे', "आरक्षणाचे बोला', लोकांचा गलका वाढत चालल्याने जानकर यांनी भाषणाचा टोन एकदम बदलला. आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तसेच कॉंग्रेसने 70 वर्षात काय केले? हे ठेवणीतले वाक्‍य उच्चारले. आरक्षण घेतल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे सांगत भाषण आटोपते घेतले. प्रा. राम शिंदे यांनीही धनगरांना संयमाचीच दीक्षा दिली. दिल्लीत नरेंद्र व मुंबईत नरेंद्र आपल्याला आरक्षण देईल, यावर विश्‍वास ठेवा, असा संयमाचा सल्लाही प्रा. शिंदे यांनी दिला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com