Jalna Jilha parishad : BJP again defeated | Sarkarnama

जालना जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे दोन,  सेना-कॉंग्रेसचा प्रत्येकी एक सभापती 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 एप्रिल 2017

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना जिल्हा परिषदेच्या सभापती निवडणुकीत देखील पराभव स्वीकारावा लागला.

जालना ः भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना जिल्हा परिषदेच्या सभापती निवडणुकीत देखील पराभव स्वीकारावा लागला.

शिवसेना-राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाची एकी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी प्रमाणेच सभापती पदाच्या निवडणुकीत देखील कायम राहिल्याने सर्वाधिक 22 सदस्य असलेल्या भाजपला एकही पद मिळू शकलेले नाही. 

औरंगाबाद जिल्हा परिषदे प्रमाणेच जालन्यात देखील शिवसेनेने भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी व कॉंग्रेसशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे शिवसेनेचे अनिरुध्द खोतकर व राष्ट्रवादीचे सतीश टोपे हे अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदी विराजमान झाले होते.

बुधवारी झालेल्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत काही चमत्कार होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस या तीन पक्षांनी शेवटपर्यंत एकी दाखवत चारही सभापतीपद आपल्याकडे राखण्यात यश मिळवले.

राष्ट्रवादीचे रघुनाथ तौर, जिजाबाई कंळबे, शिवसेनेच्या सुमन घुगे तर कॉंग्रेसचे दत्तात्रय बनसोडे हे विजयी झाले. बनसोडे वगळता राष्ट्रवादी व शिवसेनेच्या तीन्ही उमेदवारांना प्रत्येकी 34 मते मिळाली. शिवसेनेचे बंडखोर सदस्य महेंद्र पवार यांचे एक मत फुटले. कॉंग्रेस उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांना मतदान करण्याऐवजी पवार यांनी भाजपच्या उमेदवाराल मतदान केले. भाजपच्या उमेदवारांना प्रत्येकी 22 मते पडली. 

शिवसेनेकडे महिला बालकल्याण विभाग 

शिवसेनेच्या सुमन घुगे यांना महिला बालकल्याण विभाग सोपवण्यात आला आहे, तर कॉंग्रेसच्या दत्तात्रय बनसोड यांना समाजकल्याण विभागाचे सभापतीपद देण्यात आले आहे. बांधकाम, अर्थ, शिक्षण व आरोग्य ही सभापतीपदे राष्ट्रवादीकडे गेली आहेत. खाते वाटप पुढील विशेष सभेत केले जाणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख