त्या तीन तरुणांची खासदार निंबाळकरांच्या उपस्थितीत संकल्पपूर्ती  - Jalkot Three youths | Politics Marathi News - Sarkarnama

त्या तीन तरुणांची खासदार निंबाळकरांच्या उपस्थितीत संकल्पपूर्ती 

सुनील माळगे 
बुधवार, 10 जुलै 2019

लोकसभा निवडणुकीत तुळजापूर तालुक्‍यातील जळकोट येथील तीन युवकांनी वेगवेगळे संकल्प करीत सर्वांचे लक्ष वेधले होते.

जळकोटः निवडणुका आल्या की आणाभाका, आव्हान-प्रतिआव्हान आणि आगळेवेगळे संकल्प करणाऱ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची कमी नसते. लोकसभा निवडणुकीत केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता येऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी जळकोट तालुक्‍यातील तीन तरूणांनी दाढी-कटींग न करण्याचा, चष्मा आणि पायात चप्पल न घालण्याचा प्रण केला होता. 

देशात स्पष्ट बहुमताचे भाजप सरकार येऊन मोदी हेच पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान झाले. निवडणुकीआधी घेतलेला प्रण पुर्ण झाल्यामुळे आज या तीनही तरुणांनी उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत संकल्प पुर्ण केला. 

लोकसभा निवडणुकीत तुळजापूर तालुक्‍यातील जळकोट येथील तीन युवकांनी वेगवेगळे संकल्प करीत सर्वांचे लक्ष वेधले होते. शिवाजी चौकातील मेडिकल चालक महेश कारले यांनी भाजप-शिवसेना युतीचा पंतप्रधान न झाल्यास दाढी व कटिंग न करण्याचा, प्रेमनाथ चौकातील सचिन बाबुराव कदम यांनी पायात चप्पल न घालण्याचा, तर तर सलून व्यावसायिक राम आतकरे यांनी चष्मा न लावण्याची शपथ घेतली होती. 

या तीन्ही तरुणांची प्रार्थना फळाला आली आणि देशात एनडीएचे सरकार येऊन मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. मनोकामना पुर्ण झाल्यामुळे आता या तीन्ही तरुणांनी घेतलेली शपथ मागे सारत कंटीग, दाढी, चष्मा आणि चपला घालत संकल्पपुर्ती केली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत जळकोट येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात महेश कारले यांनी कटिंग व दाढी केली, तर राम आतकरे यांच्या डोळ्यांवर खासदार राजेनिंबाळकर यांनी स्वत: चष्मा चढवला. 

निवडणुकीपासून अनवाणी फिरणारे सचिन कदम यांनी सर्वांच्या समक्ष चपला घातल्या. तिघांचाही यावेळी फेटा, शाल, हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश सोनटक्के यांनीही तिघांचा पूर्ण आहेर देऊन सत्कार केला. या अनोख्या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख