jaliyanwala baug and government | Sarkarnama

"जालियनवाला बागे' तून कॉंग्रेस अध्यक्ष बाहेर, लोकसभेत दुरुस्ती विधेयक मंजूर ; विरोधकांची नाराजी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली : जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारकाच्या विश्‍वस्त मंडळातून कॉंग्रेस अध्यक्षांचे नाव हटविणारे दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकातून हुतात्मांचे स्मारक राजकारणातून मुक्त करण्याचा आणि नवा इतिहास घडविण्याचा प्रयत्न असल्याचे सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी सांगितले. मात्र कॉंग्रेससह अन्य विरोधकांनी सभात्याग करून विधेयकावरील नाराजी दर्शविली. 

नवी दिल्ली : जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारकाच्या विश्‍वस्त मंडळातून कॉंग्रेस अध्यक्षांचे नाव हटविणारे दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकातून हुतात्मांचे स्मारक राजकारणातून मुक्त करण्याचा आणि नवा इतिहास घडविण्याचा प्रयत्न असल्याचे सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी सांगितले. मात्र कॉंग्रेससह अन्य विरोधकांनी सभात्याग करून विधेयकावरील नाराजी दर्शविली. 

जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक दुरुस्ती विधेयक याआधी सोळाव्या लोकसभेच्या फेब्रुवारीत झालेल्या अंतिम अधिवेशनात गोंधळात मंजूर झाले होते. नवी लोकसभा अस्तित्वात आल्यामुळे रद्दबातल झालेले हे विधेयक आज पुन्हा सभागृहात मंजुरीसाठी मांडण्यात आले होते. त्यावरील चर्चेच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांदरम्यान जोरदार खडाजंगी सभागृहाने अनुभवली. यावर मतविभाजन होऊन विरोधी पक्षांचा विरोध 214 विरुद्ध 30 मतांनी फेटाळण्यात आला. 

चर्चेच्या उत्तरात प्रल्हाद पटेल यांनी हे विधेयक जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारकाला राजकारणाच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न आहे. मात्र यावरील चर्चेने अपेक्षित स्तर राखला नाही, अशी नाराजी व्यक्त केली. स्मारकाच्या स्थापनेवेळी पंडित नेहरू, सैफुद्दीन किश्‍चलू आणि मौलाना आझाद हे कायम सदस्य होते. मात्र त्यांच्या निधनानंतर कॉंग्रेसने नव्या सदस्यांच्या नेमणुकीसाठी 40 वर्षे का लावली, हुतात्मा उधमसिंग यांच्या कुटुंबीयांपैकी कोणालाही कॉंग्रेसने का घेतले नाही, असा सवाल पटेल यांनी केला. 

भाजपचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी कोणताही संबंध नसल्याचा हल्ला चढविताना कॉंग्रेसचे गुरजितसिंग औजल यांनी हा इतिहास बदलण्याचा सत्ताधाऱ्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे, असा आरोप केला. कॉंग्रेससोबतच तृणमूल कॉंग्रेसचे सौगत रॉय, द्रमुकचे दयानिधी मारन, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे, बसपचे दानिश अली यांनीही हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली. बिजू जनता दलाचे भर्तृहरी माहताब, वायएसआर कॉंग्रेसचे रामकृष्ण राजू यांनी विश्‍वस्त मंडळाच्या समितीमध्ये कॉंग्रेस अध्यक्षांना ठेवावे, अशी सूचना केली. 

सावरकरांना "भारतरत्न' द्या 
शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरतकौर बादल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या आजोबांनी ब्रिटिश गव्हर्नर जनरल ओडवायरला तार करून जालियनवाला बागेतील हत्याकांडाची कारवाई योग्य असल्याची तार केली होती, असा खळबळजनक आरोप केल्यामुळे कॉंग्रेसचे सदस्य संतप्त झाले होते. शिवसेनेचे विनायक राऊत यांनी सध्या कॉंग्रेसला कोणीही अध्यक्ष नसून, स्मारक समितीची बैठक झाली असती, तर कोण आले असते? त्यामुळे स्मारक समितीवरून कॉंग्रेस अध्यक्षांचे नाव हटविणे योग्य असल्याची कोपरखळी लगावली. शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानावरून राहुल गांधींवर टीका केली; तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांना "भारतरत्न' देण्याचीही मागणी केली. 

नवा इतिहास रचण्याचा प्रयत्न ... 
हा इतिहास बदलण्याचा नव्हे; तर नवा इतिहास रचण्याचा प्रयत्न आहे. कॉंग्रेससाठी हे केवळ स्मारक किंवा ट्रस्ट असेल; परंतु आमच्यासाठी ते बलिदानी पूर्वजांच्या रक्ताचे स्मृतिस्थळ आहे, असेही सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख