मी रझाकाराची औलाद, तर तुम्ही कुणाची औलाद - इम्तियाज जलील

 मी रझाकाराची औलाद, तर तुम्ही कुणाची औलाद - इम्तियाज जलील

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीदिनाच्या माझ्या गैरहजेरीवरून विरोधक माझ्यावर टीकेची झोड उठवत आहेत, त्यांना माझा सवाल असा आहे की ? मराठवाड्याला मागासलेपणातून मुक्त करण्यासाठी तुम्ही काय केले ? इतकी वर्ष सत्तेत होतात, तरी या भागाचा विकास का होऊ शकला नाही ? फक्त 17 सप्टेंबरच्या दिवशी झेंडावंदनाला उपस्थित राहायचे आणि आपणच कसे देशभक्त आहोत याचा ढोल बडवायचा हे कितपत योग्य आहे. मला रझाकारांची औलाद म्हणणारे, कुणाची औलाद आहेत असा उद्दाम सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला. 

मराठवाडा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमाला गेल्या चार वर्षापासून सातत्याने गैरहजर राहणाऱ्या इम्तियाज जलील यांच्यावर चोहोबाजूंनी टिकेची झोड उठत आहे. या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील यांना विचारले असता ते म्हणाले, शिवसेनेचे लोक मला रझाकाराची औलाद म्हणतात, रझाकार 70 वर्षापुर्वी पाकिस्तानात निघून गेले, पण आमचे या देशावर प्रेम होते म्हणून आम्ही इथेच थांबलो. 

हैदराबाद - मराठवाडा मुक्तीसंग्राम हा एक इतिहास होता तो घडून गेला, त्यावरून आता राजकारण करणे आणि आमच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्‍न निर्माण करणे चुकीचे आहे. आम्हाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, माझ्या अनुपस्थितीवरून रान पेटवणाऱ्यांनी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेनेचे गुलाबराव पाटील, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे देखील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला आपापल्या जिल्ह्यात हजर नव्हते, त्यांना कुणी प्रश्‍न विचारत नाही ? मुळात या मुद्यावरून सुरू असलेले राजकारण त्या लोकांची मानसिकता दर्शवते. मला यापेक्षा शहराच्या विकासाला प्राधान्य द्यायचे आहे, कारण लोकांनी मला विकासासाठी निवडून दिले आहे. 

17 तारखेची आठवण राहिली नाही 
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते, त्यापुर्वी शहरातील काही विकासकामे मला मार्गी लावायचे होते. त्यामुळे 16 तारखेला मुंबईत मिटींग, दुसऱ्या दिवशी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि मुलाखती होत्या. या सगळ्यांचे नियोजन करतांना मला 17 तारखेची आठवण राहिली नाही, ही माझी चूक झाली. पण मी त्यादिवशी मुंबईत कॅरमबोर्ड खेळत नव्हतो, तर शहरातील पानचक्कीच्या विकासासाठी आणि औरंगाबाद-शिर्डी रस्त्यासाठी निधी मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलत होतो असे स्पष्टीकरण देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी दिले. मराठवाडा मुक्तीदिनाला मी हजर राहणे इतके महत्वाचे असेल, तर पुढच्या वेळी तुम्ही मुख्यमंत्र्यांना बोलवू नका, मी माझ्या हाताने ध्वजारोहण करतो असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com