झारखंडमध्ये आत्ता आम्ही रोप लावले आहे फळासाठी वेळ द्यावा लागेल - इम्तियाज जलील

 झारखंडमध्ये आत्ता आम्ही रोप लावले आहे फळासाठी वेळ द्यावा लागेल - इम्तियाज जलील

औरंगाबाद : झारखंडमध्ये एमआयएमने पहिल्यांदाच चौदा मतदारसंघात उमेदवार दिले होते. येथील तरुणांमध्ये एमआयएम आणि असदुद्दीन ओवेसी यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण होते. त्यांचा आम्हाला निवडणुकप्रचारा दरम्यान प्रचंड प्रतिसादही मिळाला. पण पहिल्याच निवडणुकीत आपल्याला रिझल्ट मिळणार नाही हे आम्हाला माहित होते. सध्या आम्ही इथे रोपटे लावले आहे, त्याला फळ लागायला वेळ द्यावा लागेल अशा शब्दांत एमआयएमचे खासदार तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पक्षाच्या कामगिरीवर आपले मत मांडले. 

झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवारी घोषित झाले. भाजपच्या ताब्यातून आणखी एक राज्य जाऊन तिथे झारखंड मुक्ती मोर्चा, कॉंग्रेस आणि राजदचे आघाडी सरकार सत्तेवर आले. एमआयएमने देखील झारखंडमध्ये चौदा जांगावर आपले उमेदवार दिले होते. राष्ट्रवादी पक्षाने इथे एक जागा जिंकत खाते उघडले. एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला मात्र त्याचे रुपांतर मतांमध्ये मात्र होऊ शकले नाही. 

या पार्श्‍वभूमीवर झारखंडमधील एमआयएमच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावणारे खासदार इम्तियाज जलील यांच्याशी सरकारनामा प्रतिनिधीने संपर्क साधला. एकूणच येथील निवडणूक, एमआयएमचा प्रचार आणि पदरी आलेले अपयश यावर इम्तियाज जलील म्हणाले, झारखंडमध्ये आमची यंत्रणा नव्हती, बिहार आणि उत्तर प्रदेशातील कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही इथे लढलो. निवडणुकीआधी लोकांमध्ये एमआयएम आणि असदुद्दीन ओवेसी यांच्याबद्दल प्रचंड आर्कषण असल्याचे आमच्या लक्षात आले होते. त्यांच्या जाहीर सभांना मिळालेल्या प्रतिसादावरून ते दिसूनही आले. 

पण पहिल्याच निवडणुकीत आपल्याला यश मिळेल अशी अपेक्षा आम्ही केली नव्हती, आम्हाला ते कळालेही होते. तरी दोन-तीन मतदारसंघ असे होते जिथे आम्हाला थोडीफार जिंकण्याची आशा होती पण ते घडले नाही. परंतु आम्ही त्यामुळे नाउमेद नक्कीच झालेलो नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास बिहारच्या किशनगंज मतदारसंघातून एमआयएमने तीनवेळा निवडणूक लढवली. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये अपयश आल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात आम्ही तिथे विजय मिळवला. 

झारखंडमध्ये प्रस्थापित पक्षांना पराभव स्वीकारावा लागला, त्या तुलनेत एमआयएम हा पक्ष नवखा होता, यंत्रणा नसतांना आम्हाला मिळालेला प्रतिसाद निश्‍चितच उर्जा देणारा होता. या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही झारखंडमध्ये एक रोपटे लावले आहे. भविष्यात त्याचे वृक्षात रुपांतर होऊन फळ यायंला वेळ लागेल आणि आमची तोपर्यंत वाट पाहण्याची तयारी असल्याचेही इम्तियाज जलील यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com