jalil and mim party | Sarkarnama

" एमआयएम' मध्ये इम्तियाज जलील यांचे महत्व वाढले...

जगदीश पानसरे
शनिवार, 15 डिसेंबर 2018

औरंगाबाद : एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गैरहजेरीत आधी पुणे आणि आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात आमदार इम्तियाज जलील यांनी किल्ला लढवला. तेलंगणा राज्यातील निवडणूक प्रचारात 105 सभा घेतल्यामुळे ओवेसी आजारी पडले. त्यामुळे त्यांच्या जागी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात भाषणाची जबादारी इम्तियाज यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आणि ती त्यांनी पेलली देखील. एमआयएमध्ये इम्तियाज जलील यांना महत्व प्राप्त झाल्यामुळे ते पक्षातील तिसऱ्या क्रमांकाचे नेते बनल्याची चर्चा यानिमित्ताने रंगू लागली आहे. 

औरंगाबाद : एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गैरहजेरीत आधी पुणे आणि आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात आमदार इम्तियाज जलील यांनी किल्ला लढवला. तेलंगणा राज्यातील निवडणूक प्रचारात 105 सभा घेतल्यामुळे ओवेसी आजारी पडले. त्यामुळे त्यांच्या जागी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात भाषणाची जबादारी इम्तियाज यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आणि ती त्यांनी पेलली देखील. एमआयएमध्ये इम्तियाज जलील यांना महत्व प्राप्त झाल्यामुळे ते पक्षातील तिसऱ्या क्रमांकाचे नेते बनल्याची चर्चा यानिमित्ताने रंगू लागली आहे. 

एक खासदार आणि तेलंगणा व महाराष्ट्र अशी दोन राज्ये मिळून नऊ आमदार असलेल्या एमआयएम पक्षाची धुरा बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी आणि त्यांचे बंधू आमदार अकबरुद्दीन ओवेसी सांभाळत आहेत. हैदराबाद मार्गे महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर नांदेड-वाघाळा महापालिका, बीड, नगरपालिका आणि त्यानंतर राज्यातील अनेक शहरात एमआयएमने आपले बस्तान बसवले. 

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे औरंगाबाद आणि भायखाळा मतदारसंघात खाते उघडले आणि अनुक्रमे इम्तियाज जलील व वारीस पठाण निवडून आले. पंधरा दिवसांत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पेशाने पत्रकार असलेल्या इम्तियाज जलील यांनी पहिल्याच फटक्‍यात विजय संपादन करत राजकारणात जोरदार प्रवेश केला. पत्रकार असल्यामुळे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थितीची जाण आणि वक्तृत्व कला अंगी असल्याने इम्तियाज जलील यांनी पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले. 2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणूकीत 24 नगरसेवक निवडून आणत इम्तियाज जलील यांनी शहरात एमआयएमची पाळेमुळे घट्ट केली. विधानसभेत प्रभावीपणे मतदारसंघ आणि राज्यस्तरावरील मुस्लिमांचे प्रश्‍न मांडण्यातही ते अग्रेसर राहिले. 

ओवेसी बंधुचा विश्‍वास संपादन केला 

औरंगाबादच्या राजकारणात दारू बंदी, वीज, पाणी प्रश्‍नावर इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमने आक्रमक आंदोलने केली. नुकत्याच झालेल्या जातीय दंगलीत होरपळलेल्या हिंदू-मुस्लिम अशा दोन्ही समाजाच्या लोकांना त्यांचे व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक मदत करत त्यांनी आपल्या पक्षावर असलेला जातीयवादाचा शिक्का पुसण्याचा देखील प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात पक्षाची वाटचाल सुरळीत सुरू असल्याने ओवेसी बंधूचा इम्तियाज यांच्यावरील विश्‍वास अधिकच वाढला. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दलित-मुस्लमांसह वंचित बहुजनांना एकत्रित आणण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेतला. 

सत्तर वर्षापासून कॉंग्रेस-आघाडीने आमचा व्होट बॅंक म्हणून केवळ वापर केला असा आरोप करत असदुद्दीन ओवेसी यांनी देखील आंबेडकर यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. या नव्या राजकीय समीकरणात देखील इम्तियाज जलील यांना ओवेसी बंधुनी सहभागी करून घेतले होते. अगदी दोन ऑक्‍टोबर रोजी औरंगाबादेत ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात इम्तियाज जलील यांच्या घरीच खलबते झाली होती. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या औरंगाबाद येथील सभेला ओवेसी यांनी हजेरी लावली होती. पण त्यानंतर पुण्यात झालेल्या सभेला मात्र त्यांना जाता आले नाही. अशावेळी महाराष्ट्रात पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या इम्तियाज जलील यांच्यावर ओवेसींनी विश्‍वास टाकला आणि पुण्याच्या सर्वात मोठ्या मैदानात जमलेल्या लाखोंच्या गर्दीसमोर इम्तियाज यांनी तडाखेबंद भाषण केले. 

पुण्याच्या रेकॉर्डब्रेक सभेनंतर राज्याचे लक्ष्य नागपूरात होणाऱ्या वंचित आघाडीच्या सभेकडे लागले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्यात जाऊन ओवेसी काय बोलणार याची उत्सूकता सगळ्यांना होती. पण प्रकृती बरी नसल्यामुळे ओवेसी सभेला जाऊ शकले नाही. इथेही ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांच्यावर जबादारी सोपवली. अपेक्षेप्रमाणे इम्तियाज यांनी पंधरा मिनिटांच्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. तेलंगाणा निवडणुक प्रचार संपताच इम्तियाज जलील यांनी धुळे महापालिका निवडणुकीचे मैदानही गाजवले. पहिल्याच निवडणुकीत एमआयएमचे दहा पैकी चार नगरसेवक निवडूण आणण्यात त्यांना यश आले.एकंदरीत आमदार इम्तियाज जलील यांचे पक्षात वर्चस्व आणि महत्व वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे असदुद्दीन, अकबरुद्दीन या ओवेसी बंधूनंतर एमआयएममध्ये इम्तियाज जलील हेच तिसऱ्या क्रमांकाचे मोठे नेते असल्याचे बोलले जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख