मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे जलील यांना वावडेच

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे जलील यांना वावडेच

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा "एमआयएम' चे खासदार इम्तियाज जलील मुक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही ? यावरून सोशल मिडियावर वॉर सुरू झाले आहे. आमदार असतांना पाच वर्षातील एकाही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याला ते उपस्थित राहिले नव्हते असा आरोप केला जातोय. खासदार झाल्यानंतर यावेळी तरी त्यांनी उपस्थितीत राहून रझाकारांच्या काळातील एमआयएम आणि आताची एमआयएम वेगळी असल्याचे दाखवून द्यावे असे आवाहन करणाऱ्या पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्याला इम्तियाज जलील यांनी आपल्याला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले आहे. 

एमआयएम आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा संबंध नेहमीच जोडला जातो. 17 सप्टेंबरच्या निमित्ताने यावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 2014 मध्ये औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते. आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात एकदाही त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. यावरून त्यांच्यावर तेव्हा टिका देखील झाली. 

उद्या, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील सिध्दार्थ उद्यानात सकाळी ध्वजारोहण आणि हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे. शिष्टाचारानूसार या सोहळ्याला लोकप्रतिनीधी, खासदार, आमदार उपस्थित राहणे अपेक्षित असते. इम्तियाज जलील हे आमदार पदाच्या आपल्या कार्यकाळात या सोहळ्याला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर टिकेचा भडीमार झाला होता. आता पुन्हा एकदा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून एका फेसबुक पेजवरून इम्तियाज जलील यांना " उद्याच्या सोहळ्याला हजर राहून इम्तियाज जलील यांनी रझाकारांची एमआयएम आणि आताची एमआयएम वेगळी असल्याचे दाखवून द्यावे असे आवाहन करण्यात आले होते. फेसबुकवरून करण्यात आलेल्या या आवाहनाला एक लोकप्रतिनिधी म्हणून योग्य उत्तर देण्याऐवजी मूळ विषयाला बगल देत जलील यांनी त्या आवाहनकर्त्याला अत्यंत उद्दाम भाषेत उत्तर दिल्याचे दिसते. 

यावरून आता सोशल मिडियावर वॉर सुरू झाले असून इम्तियाज जलील यांनी संबंधित पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला उत्तर देताना म्हटले आहे की " दरवेळी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या माझ्या उपस्थितीवरून प्रश्‍न उपस्थित करणे आणि आमच्या देशभक्तीवर संशय घेणे कितपत योग्य आहे. लोकसभा निवडणुकीत मला निवडून दिलेल्या पावणे पाच लाख मतदारांचा हा अपमान आहे. 15 ऑगस्ट स्वांतत्रदिन असो, की 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन यावेळी हातात तिरंगा घेऊन फिरणारे मुस्लिम तरूण, भारत माता की जयच्या घोषणा देत वाहनांवरून फिरणारे तरूण तुम्हाला दिसत नाहीत का ? असा सवाल इम्तियाज यांनी आपल्या प्रत्युत्तरात केला आहे. 

माझ्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीवरून कुणी माझ्या देशभक्तीची तुलना करू नये, असे विचार डोक्‍यात येणे यातून संबंधिताची मानसिकता दिसून येते. राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मला अशा मानसिकतेच्या लोकांकडून घेण्याची गरज नाही' अशा शब्दांत इम्तियाज जलील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 
रझाकारांशी माझा काय संबंध- इम्तियाज जलील 
या संदर्भात खासदार इम्तियाज जलील यांच्याशी सरकारनामा प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने दरवेळी हा वाद उकरून काढणे निरर्थक आहे. माझा आणि रझाकारांचा काय संबंध ? परंतु मी जेव्हा काही चांगले करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अशा प्रकारचे वाद उकरून काढले जातात. मुक्तीसंग्राम दिन आणि त्यासाठी लढा देणाऱ्या हुतात्म्यांबद्दल मला देखील नितांत आदर आहे. पण काही कारणांमुळे मी जर सोहळ्याला हजर राहू शकलो नाही तर त्याचा चुकीचा अर्थ लावणे योग्य नाही. विधानसभा निवडणुका तोंडावर आहे, मी एमआयएमचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असल्याने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. राज्यातील मुलाखती आणि बैठकांचे नियोजन करतांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाची आठवण राहीली नाही. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानूसार मी आज रात्रीच मुंबईला जाणार आहे. तिथे रात्री उशीरापर्यंत बैठका आणि उद्या इच्छूकांच्या मुलाखती घेणार आहे. त्यामुळे पुन्हा माझ्या अनुपस्थितीवरून कुणी गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन देखील इम्तियाज जलील यांनी केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com