हर्षवर्धन जाधव यांनी " वंचित' सोबत यावे, त्यांचे स्वागत - इम्तियाज जलील

हर्षवर्धन जाधव यांनी " वंचित' सोबत यावे, त्यांचे स्वागत - इम्तियाज जलील

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत एखाद्या अपक्ष उमेदवाराने अडीच लाखाहून अधिक मत घेणे ही साधी गोष्ट नाही. हर्षवर्धन जाधव एक सुशिक्षित आणि डॅशिंग तरूण आहेत. राजकाराणाचा त्यांना चांगला अनुभव आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात त्यांनी घेतलेली भूमिका महत्वाची होती. भविष्यात त्यांनी वंचित बहुजन आघाडी सोबत यावे, असे आवाहन एमआयएम-वंचित बहूजन आघाडीचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले. 

"कॉफी विथ सकाळ' कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना वंचित बहुजन आघाडीत येण्याची ऑफर दिली. भविष्यातील राजकीय समीकरणे आणि वातावरण पाहता त्यांनी आमच्याकडे यावे, त्यांचे स्वागतच करू असे ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी समाजाने वंचित बहुजन आघाडीसोबत जावे असे विधान हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपुर्वी सोशल मिडियाच्या माध्यमातून केले होते. या संदर्भात विचारले असता इम्तियाज जलील म्हणाले, हर्षवर्धन जाधव आक्रमक आहेत. आपल म्हणणे, बाजू ते ठामपणे मांडतात. उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांना मतदारसंघातील प्रश्‍नांची चांगली जाण आहे. लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढत असतांना त्यांनी चांगली लढत दिली. 

मराठा आरक्षणा संदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका, आंदोलनातील सहभागामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. एखाद्या अपक्ष उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत अडीच लाखांहून अधिक मत मिळतात ही दुर्लक्ष करून चालणारी गोष्ट नाही. त्यांचा पराभव झाला असला तरी लोकांनी त्यांना दिलेला पाठिंबा मोठा होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी सोबत जाण्याची इच्छा जाधव यांनी बोलून दाखवली होती. 

राज्यात परिवर्तन घडवायचे असेल तर त्यांच्या सारखे सुशिक्षित, आक्रमक तरुण नेते वंचित बहुजन आघाडीकडे आले पाहिजे. जाधव यांनी विधानसभा निवडणुकीत वंचितसोबत यावे, आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू अशी ग्वाही इम्तियाज जलील यांनी दिली. शहरात जातीय सलोखा निर्माण होऊन चांगले वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने शिवजयंतीला त्यांनी मला बोलावणे हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता, त्याचे कौतुक व्हायलाच हवे असेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com