त्रिकुट विखुरले पण आम्ही दोघांनी जपलाय मैत्रीचा अतुट धागा - इम्तियाज जलील

 त्रिकुट विखुरले पण आम्ही दोघांनी जपलाय मैत्रीचा अतुट धागा - इम्तियाज जलील

औरंगाबाद : पुण्यातील पत्रकारितेतील तो काळ इतिहासाचे एखादे पान उलटावे आणि त्यातल्या आठवणीत हरवून जावे असा. पत्रकारितेचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर पुण्यात तिघेही वेगवेगळ्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमांसाठी काम करत होतो. एकमेकांची इतकी सवय झाली की दिवसभरात एकदा तरी भेट घ्यावीशी वाटायची. आम्हाला ओळखणाऱ्यांना आम्ही तिघे एकत्र दिसलो नाही की अप्रुप वाटायचे. "अरे आज तो दिसत नाही' असा प्रश्‍न आमच्या पैकी एकाला हमखास विचारला जायचा. पंकज खेळकर, व्यंकटेश चपळगांवकर आणि मी अशी आमची एक तपाची मैत्री. दुर्देैवाने व्यंकटेश आज आमच्यात नाही. पण आठवणीत तो कायम आहेच अशा शब्दांत खासदार इम्तियाज जलील यांनी "फ्रेंडशीप डे'च्या निमित्ताने सरकारनामाशी बोलतांना आपल्या मैत्रीला उजाळा दिला. 

पत्रकारिता करत असतांना नशिबाने राजकारणात ओढला गेलो. पुण्यातील त्यावेळच्या अनेक मित्रांना माझा हा निर्णय खटकला, कुणी याला आगाऊपणा म्हटले, तर कुणी जोखीम. पण माझ्या पाठीशी केवळ खंबीरपणे उभे राहिले ते माझे दोन मित्र म्हणजे पंकज आणि व्यंकटेश. एक राजकीय कार्यक्रम कव्हर करण्यासाठी जात असतांना काही वर्षांपूर्वी व्यंकटेश चपळगांवकरच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात तो दगावला. पंकज-व्यंकटेश आणि माझ्या मैत्रीला कुणाची तरी नजर लागली. "हम तीन यार' चे त्रिकुट विखुरले. पण पंकज आणि मी दोघांनी एकमेकांना आधार देत मैत्रीचा हा धागा तसाच अतुट ठेवला. 

खासदार इम्तियाज जलील आपल्या एक तपाच्या मैत्रीचा प्रवास उलगडून सांगताना म्हणाले, साधरणता 2003 चा तो काळ होता. पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर इलेक्‍ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून खऱ्या पत्रकारितेला सुरूवात केली. मी एनडीटीव्हीला, व्यंकटेश स्टार आणि पंकज आजतकसाठी काम करत होतो. पुण्यात कुठे राहायचे असा प्रश्‍न आला तेव्हा, कुणी तरी मला इलेक्‍ट्रॉनिक मिडियाचे बरेच पत्रकार राहत असलेल्या भागाचा पर्याय सुचवला. तिथेच आमच्या तिघांची गट्टी जमली. 

असाईनमेंटला जायचे असले की आम्ही सोबत जायचो. पंकजला मी फोन करायचो तेव्हा सुरूवातीला त्याने मला टाळले, मी बाहेर आहे, आता मला वेळ नाही अशी कारणे तो द्यायचा तेव्हा " हा किती आखडू आहे' असे माझे त्याच्याबद्दलचे मत झाले. कालांतराने मात्र हे मत बदलून आमच्यात घट्ट मैत्री झाली. आम्हा तिघांचा एकत्रित वावर इतका होता, की एखाद्या ठिकाणी आमच्यापैकी कुणी दिसले नाही, तर इतर आम्हाला अरे आज तुमचे त्रिकुट नाही, असा टोमणा मारायचे. आयुष्यातील चांगले, वाईट, खडतर असे सगळे क्षण आम्ही एकत्रित अनुभवले. 

व्यंकटेशचे जाणे चटका लावणारे... 
निवडणुकीच्या काळात मी आणि पंकज एकदा मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा कव्हर करण्यासाठी गेलो. त्यासाठी पुण्यातून एक दिवस आधीच औरंगाबादला आलो, रात्री माझ्याच घरी आराम करून दुसऱ्या दिवशी सकाळी नांदेडला जाण्याचे नियोजन होते. 31 मार्चला ती सभा होती, आणि 30 मार्चला पंकज खेळकरचा वाढदिवस होता. रात्री घरी आल्यावर आईला भेटलो, तिच्या पाया पडलो, गप्पाटप्पा मारल्या आणि केक कापायला घेतला. तेवढ्यात सोलापूर येथे शरद पवारांची सभा कव्हर करण्यासाठी गेलेला आमचा मित्र व्यंकटेश चपळगांवकर याच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी कानावर आली. अपघात मोठा होता, व्यंकटेश सिरियस असल्याचं कळालं. आमचा जीव कशातच लागत नव्हता. सकाळी नांदेडला जावे, की सगळे सोडून व्यंकटेशकडे जावे या विंवचनेत असतांनाच तो निधन पावल्याची दुःखद माहिती कानावर आली. आम्ही तातडीने नांदेडचा कार्यक्रम रद्द केला आणि पुुण्याला गेलो. व्यंकटेशच्या अचानक जाण्याने आमच्या तिघांची जोडी फुटली. 
पंकज आणि मी आम्ही दोघांनी या दुःखातून एकमेकांना सावरले आणि त्याच्या आठवणी कायम ठेवत पुढील वाटचाल सुरू केली. व्यंकटेशच्या जाण्यानंतर आम्ही एकमेकांची जास्त काळजी घ्यायला लागलो होतो. 
पंकजचे पाठबळ कायम मिळाले 
कालांतराने मला राजकारणात येण्याची ऑफर आली. एमआयएम पक्षाकडून औरंगाबादमधून निवडणूक लढवण्यासाठी विचारणा झाली. काय करावे कळत नव्हते. मी निवडणूक लढवणार या चर्चेनेच अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण पंकज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. राजकारणात तू यशस्वी होऊ शकतो हा विश्‍वास त्याने मला दिला. एवढेच नाही तर प्रचारासाठी त्याने मला माझ्या पत्रकारितेच्या काळातील चांगले व्हिडिओ तयार करून दिले. व्हिडिओ एडिंटींगमध्ये पंकजचा हातखंडा होता. निवडणुकीत मला त्याची खूप मदत झाली. तो प्रचारासाठी दोनदा औरंगाबादेतही आला. मी आमदार झाल्यावर सर्वाधिक आनंद पंकज आणि त्याच्या कुटुंबियांना झाला. पुण्याच्या वास्तव्यात मी पंकजच्या कुटुंबातील एक सदस्यच बनलो होतो. 
आमदार झाल्यावरही आमच्या मैत्रीत कधी अंतर आले नाही, भेटीगाठीला मर्यादा आल्या, पण मी पुण्यात किंवा पंकज औंरगाबादेत आला आणि आम्ही भेटलो नाही असे कधीच घडले नाही. लोकसभा निवडणूक लढवायचा विचार आला तेव्हा देखील पंकज पुन्हा माझ्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. खासदार झाल्यावर मी पंकजला दिल्लीला बोलावून घेतले, त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या, एकत्रित फिरलो. त्याला संसद व सभोवतालचा परिसर दाखवला. राजकारणातील माझे यश आणि त्याचा आनंद पंकजच्या डोळ्यात मला दिसत होता. एक तपाची आमची ही मैत्री यापुढेही वर्षोनुवर्ष अशीच कायम राहील असा ठाम विश्‍वास देखील इम्तियाज जलील यांनी शेवटी व्यक्त केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com