सबका साथ सबका विकास, मराठवाड्याच्या वाट्यालाही येऊ द्या - इम्तियाज जलील

 सबका साथ सबका विकास, मराठवाड्याच्या वाट्यालाही येऊ द्या - इम्तियाज जलील

औरंगाबाद : निवडून आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात सहभाग घेतांना एमआयएमचे औरंगाबाद येथील खासदार इम्तियाज जलील यांनी मतदारसंघासह मराठवाड्यातील अनेक प्रश्‍नांना हात घातला. विशेषता रेल्वे प्रश्‍नावर बोलतांना त्यांनी मोदी सरकारच्या "सबका साथ सबका विकास' या घोषणे वरून टोला लगावला. मराठवाड्यातील अनेक रेल्वे प्रकल्प सत्तर वर्षांपासून रखडलेले आहेत, त्याला आवश्‍यक निधी उपलब्ध करून द्या, आणि "सबका साथ सबका विकास' मराठवाड्याच्या वाट्यालाही येऊ द्या असा टोला इम्तियाज जलील यांनी सभागृहात बोलतांना लगावला. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात इम्तियाज जलील यांनी शहरातील पाणी प्रश्‍न आणि विमान कनेक्‍टिव्हिटीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात त्यांनी रखडलेल्या मराठवाड्यातील रेल्वे प्रश्‍नावर रेल्वे मंत्र्यांचे लक्ष केंद्रीत करून भरघोस निधीची तरतूद करण्याची मागणी केली. आपल्या निवेदनात इम्तियाज जलील म्हणाले, जालना-खामगांव हा रेल्वेमार्ग मराठवाड्यातील अनेक भागांना एकमेकांशी जोडण्यासाठीचा महत्वाचा मार्ग आहे. परंतु गेल्या पंचवीस वर्षापासून तो रखडलाय. मराठवाड्याची आणि राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद मॉडल रेल्वेस्थानकाचा एक टप्पा पुर्ण झाल्यानंतर पुढील दोन टप्यांचे काम केवळ निधी नसल्यामुळे रखडले आहे. जगभरातून येणारे पर्यटक, उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीने मॉडेल रेल्वेस्थानकाच्या दोन टप्यांचे काम तातडीने सुरू होणे गरजेचे आहे. याशिवाय औरंगाबादेत रेल्वे पीटलाईन तयार करण्याची मागणी वर्षानुवर्षे केली जाते. पीटलाईन नसल्यामुळे इथे लांब पल्याच्या रेल्वे येऊ शकत नाही. पीटलाईन झाल्यास औरंगाबादेतून इतर राज्यांना रेल्वेमार्गाशी जोडणे सोपे होणार आहे. 

नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडा 
मराठवाड्यातील नांदेड विभाग दक्षिण रेल्वेशी जोडला गेला आहे. मात्र आम्हाला मुंबई म्हणजे मध्य रेल्वेशी जोडा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून केली जात आहे. यावर रेल्वे मंत्र्यांनी गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा, जेणेकरून मराठवाड्यातील रेल्वेविकासाला गती मिळू शकेल. मनमाड-परभणी रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणासाठी भरीव निधी, दौलताबाद-चाळीसगाव या नव्या 80 कि.मी. रेल्वेमार्गाला गती देणे देखील आवश्‍यक असल्याचे इम्तियाज जलील यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. 

पर्यटन आणि उद्योगाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या औरंगाबाद रेल्वेस्थानाकातून एकही स्वतंत्र रेल्वे धावत नाही. बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वेचे स्थानक अशीच या शहराची ओळख बनली आहे. औरंगाबादहून अजमेर, जयपूर, बंगळूरू, दिल्ली, गोवा, पुणेसाठी रेल्वेसेवा सुरू करावी अशी नवी मागणी इम्तियाज जलील यांनी यावेळी केली. औरंगाबाद येथील ड दर्जाच्या मुकुंदवाडी रेल्वेस्थानकात एक्‍स्प्रेस गाड्यांना थांबा द्यावा हा मुद्दा देखील इम्तियाज जलील यांनी आपल्या निवदेनात उपस्थित केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com