शहरातील वातावरण कोण खराब करत आहे ते पोलिस ओळखून आहेत - इम्तियाज जलील

शहरातील वातावरण कोण खराब करत आहे ते पोलिस ओळखून आहेत - इम्तियाज जलील

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या धक्‍क्‍यातून शिवसेना अजून सावरलेली दिसत नाही. त्यामुळेच शहरात काही वाईट घडलं की ते एमआयएममुळे आणि चांगले झालं तर शिवसेनेमुळे अशी भूमिका ते घेत आहे. आम्हाला हे अपेक्षित असले तरी शहरातील वातावरण कोण खराब करतय हे पोलिस चांगलेच ओळखून आहेत. 

कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राखायची हे पोलिस आयुक्तांना माहित आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आरोपाला मी महत्व देत नाही अशा शब्दांत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे आरोप सरकारनामाशी बोलतांना फेटाळून लावले. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन त्यांना निवदेन दिले होते. लोकसभा निवडणुकीत एमआयएम विजयी झाल्यापासून शहरातील वातावरण बिघडत असून लोकांमध्ये दहशत आणि हिंदूवरील हल्ले वाढल्याचा दावा केला होता. 

या संदर्भात खासदार इम्तियाज जलील यांना विचारले असता ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासून शिवसेना एमआयएमवर सातत्याने आरोप करते आहे. पराभवानंतर असे प्रकार घडणार हे मला माहित होते. पण कुठे तरी हे थांबणे गरजेचे आहे. कुठल्याही चुकीच्या कृत्याचे समर्थन माझ्याकडून कदापी होणार नाही हे मी याआधी देखील स्पष्ट केले आहे, आता पुन्हा करतोय. पण शहरात एखादी घटना घडली की त्याचा थेट संबंध आमच्या पक्षाशी जोडणे, प्रत्येक मुस्लीम व्यक्ती हा एमआयएमचा कार्यकर्ताच आहे असे मानून घडलेल्या प्रकाराला आम्हाला जबाबदार धरणे योग्य नाही. 

काही चुकीचे घडले असेल तर त्याची माहिती द्या, एमआयएमशी संबंधित कुणी त्यात असेल तर नक्कीच कारवाई करू. पण उठसूट एमआयएमचे नाव घेऊन भडकवाण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नेत्यांनी करू नये, आम्ही तो कदापी यशस्वी होऊ देणार नाही. शिवसेनेकडून चिथावणीखोर वक्तव्य केली जात असली तरी त्याला प्रत्युतर द्यायचे नाही ही माझी भूमिका आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील मी हे सांगितले आहे. कारण यातून शहरातील वातावरण खराब होऊ शकते आणि मला ते होऊ द्यायचे नाही. राहिला प्रश्‍न दहशतीचा आणि शहरातील वातावरण बिघडण्याचा, तर ते कुणामुळे होतेय हे पोलिस ओळखून आहेत. कुठल्याही परिस्थीतीला तोंड देण्यासाठी पोलीस प्रशासन सक्षम आहे. 

रेल्वेस्थानकावरील प्रकार दुर्दैवी 
रेल्वेस्थानकातील फलकावर पिवळा रंग टाकून औरंगाबाद नावावर पोस्टर चिटकवण्याचा प्रकार तर दुर्दैवीच म्हणावा लागेल. यातूनही शहरातील वातावरण कोण खराब करतयं हे स्पष्ट होते. मुळात हा प्रकार घडेपर्यंत रेल्वे प्रशासन आणि पोलीस काय करत होते ? हा माझा सवाल आहे. शहराच्या विकासासाठी अशा घटना चांगल्या नाहीत. नागरिकांनी देखील याला फारसे महत्व देऊ नये असे आवाहनही इम्तियाज जलील यांनी केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com