भाजपत अंतर्गत 'खटका'..जळगाव जिल्ह्याच्या विकासाला 'चटका'!

राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणसवीस यांच्यापासून तर थेट भाजपच्या आमदारांपर्यत सर्वांनी केलेल्या विकासाचे गोडवे गायले. अगदी जळगाव जिल्ह्याच्या पातळीवर विचार केला तर तब्बल सहा आमदारांचे दान मतदारांनी भाजपच्या झोळीत टाकलं. मात्र, त्याची भरपाई म्हणून जळगाव जिल्ह्याला विकासाचे झुकते माप हवे होते. मात्र, प्रत्यक्षात तसेच झालेच नाही, उलट पक्षाच्या अंतर्गत वादाचे उट्टे काढण्यात जिल्हयाचा विकासालाच 'टार्गेट' करून तो रोखण्यात आला. पक्षाअंतर्गत वाद असल्यामुळे पालकमंत्रीही जिल्हाला कामे करणारा मिळू शकला नाही हेच दुर्दैव आहे. आरोग्य, कृषी विद्यापीठाला चालना ही एकमेव बाब वगळली तर जिल्ह्यावासियांच्या पदरात काय पडले याचा विचार आता सत्तेतील भाजपच्या नेत्यांनीच करावयाचा आहे.
भाजपत अंतर्गत 'खटका'..जळगाव जिल्ह्याच्या विकासाला 'चटका'!

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना त्याच्या विरोधात जळगाव जिल्हयातून वणवा पेटला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनी विधीमंडळात आघाडी सरकारला प्रश्‍न विचारून अक्षरश: जेरीस आणले. त्यानंतर रस्त्यावर उतरूनही त्यांनी आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी जळगाव जिल्हयात आंदोलन कापसाला सात हजार रूपये भाव देण्याच्या मागणीसाठी तत्कालीन आमदार व आजचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आमरण उपोषणास बसले होते. त्यामुळे शेतीच्या प्रश्‍नावर राज्याचे राजकारण ढवळून निघाले. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह राज्यातील शेतकऱ्यांनी आघाडी सरकारला धडा शिकविण्याचा निर्धार केला होता. अर्थात त्याचा फायदा निश्‍चित भाजपलाच झाला. केवळ दोन आमदार असलेल्या भाजपचे जिल्हयात तब्बल सहा आमदार निवडून आले.

राज्यात सत्तेवरही भाजपच आल्याने जळगावचा कायापालट होईल असे चित्र वाटत होते. खडसे यांच्या माध्यमातून क्रमाक दोनचे मंत्रीपद मिळाले, त्यानंतर गिरीश महाजन यांनाही जलसंपदासारखे महत्वाचे पद मिळाले. त्यामुळे जिल्हयातील जनता सुखावली. परंतु त्यांचे हे सुख फार दिवस टिकले नाही.

पालकमंत्री पदाचा फडसलेला डाव
जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना मंत्रीपदावरून गैरव्यवहाराच्या आरोपामुळे पायउतार व्हावे लागले. भाजपतील अंतर्गत कलहामुळेच त्यांना व्यवस्थित बाजूला करण्यात आल्याची चर्चा भाजपच्याच कार्यकर्त्यांत सुरू असताना खडसेंनीच त्याचा उहापोह करून पक्षांतर्गत वादात त्याचे बीज असल्याचे स्पष्ट केले. त्यातच खडसे आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यातील सुप्त असलेला वाद उघड झाला. दोघांचे कार्यकर्ते खुलेपणाने सभेत एकमेकांच्या विरूध्द भिडले. पक्षाचा हा अंतर्गत वाद होता. त्यामुळे विकास कामे अन वाद यात अंतर राखण्याची गरज होती.

परंतु त्याच ठिकाणी गल्लत करण्यात आली. पक्षाच्या अंतर्गत वादमिटविण्यासाठी थेट 'मध्यस्थ' पालकमंत्री मध्यस्थी ठेवण्याची खेळी करण्यात आली. वास्तविक पालकमंत्री शासनाचा प्रतिनिधी असतो त्यामुळे त्याचा उपयोग पक्षाचा अंतर्गत वाद रोखण्यासाठी करणे चुकीचेच होते. परंतु, तो डाव भाजपने खेळला. प्रथम फुंडकरांना नियुक्त करण्यात आले, त्यानंतर राज्यातील क्रमांक दोनचे मंत्री असलेले कडक शिस्तीचे चंद्रकांत पाटील यांना नियुक्त करण्यात आले. परंतु, दोन्ही डावात पक्ष फसल्याचे दिसून आले.

फुंडकर जळगावला एकदाच आले, तर दुसरे पालकमंत्री प्रारंभी आठवड्यातून एकदा आले, त्यानंतर त्यांचा येण्याचा कालावधी वाढतच केला. जळगावची परिस्थिती पाहून तेही हतबल झाले असल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे तर त्यांनाही आता जिल्हयाच्या राजकारणाची 'हवा' लागल्याची पक्षाच्या कार्यकर्त्यात चर्चा आहे. आता तर तेही तीन-तीन महिने जळगावात येण्यास तयार नाहीत. आले तर कुणाचे काहीही न ऐकता हवाईमार्गे निघून जातात. त्यामुळे जळगावच्या विकासाचेच नव्हे तर अनेक प्रश्‍न प्रलंबीत आहेत.

जळगाव जिल्हयातील असलेले राज्याचे जलसंपदामंत्री नाशिक येथे पालकमंत्री आहेत, ते तेथे जनता दरबार घेतात. परंतु, जळगावच्या पालकमंत्र्यांना महापौर विमानळावर भेट देण्यासाठी गेल्यास त्याना भेटण्यास त्यांना वेळ मिळत नाही. जळगावकरांवर आता अशी वेळ आली आहे.

जिल्ह्याचा विकास शून्य
भाजपच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद रोखण्यासाठी भाजपने चक्क जळगावसाठी शासनच वेठीस धरले असे म्हटले पाहिजे. सत्तेतील गेल्या तीन वर्षाचा जळगावचा हिशेब पाहिल्यास विकासात जळगाव जिल्हयाला काहीच मिळालेले नाही. महामार्ग चौपदरीकरणाचा मोठा गाजावाजा करून उद्‌घाटन करण्यात आले. परंतु, त्याचे काम सुरूच झाले नाही. त्यामुळे आजही महामार्गावरील खड्डयातूनच प्रवास करावा लागत आहे. सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत जिल्हयात मोठमोठे आकडे जाहीर करण्यात आले. तेही आजही कागदावरच आहेत. प्रत्यक्षात तीन वर्षात कामे अंमलात आलीच नाही. त्यामुळे शेळगाव बॅरेज, पाडळसरे, महाकाय जलपुर्नभरण, थेट राष्ट्रपतीच्या हस्ते उदघाटन झालेले बोदवड उपसा सिंचन प्रकल्प यापैकी एकाही प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही.

या शिवाय जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतचा प्रश्‍न तर गंभीरच आहे. जळगाव शहराची तर गेल्या तीन वर्षात वाताहतच झाली आहे, महापालिकेच्या कर्जाचा प्रश्‍न सुटलाच नाही, गाळेधारकांचा आणि शहरातील अतिक्रमणाचा प्रश्‍न कायम आहे, जळगावच्या रस्त्याची स्थिती ग्रामीण भागापेक्षा वाईट झाली आहे. मुख्यमंत्र्यानी जळगावच्या विकासासाठी दिलेले 25 कोटी रूपये उपयोगात आणण्यासाठी तब्बल तीन वर्षे लागली. कृषी महाविद्यालय आणि आरोग्य विद्यापीठ एवढीच तीन वर्षातील सांगण्यासारखी कामे आहेत. बाकी विकासाच्या बाबतीत जळगाव काहीही मिळालेले नाही.

पक्ष कार्यकर्तेही हतबल
गेल्या तीन वर्षात भाजपनेच सुरू केलेले आपले अंतर्गत वादातच गेले आहेत. पुढे आणखी काय? हा प्रश्‍न कायम आहे. परंतु, भाजपच्या या अंतर्गत वादात जनतेच्या प्रश्‍नाकडे मुख्यमंत्र्यानी का दुर्लक्ष केले, सहा आमदार आणि दोन खासदारांचे भरभरून दान देणाऱ्या जळगाव जिल्हावासियांची नेमकी चूक काय? हा प्रश्‍न जनताच नव्हे तर भाजपतील कार्यकर्तेही विचारू लागले आहे. सत्ता असूनही पक्षातील अंतर्गत वादामुळे कार्यकर्तेही हतबल झाले आहेत. बोलावे कुणाकडे असा त्यांच्यापुढेही प्रश्‍न आहे. कायकर्त्याचीच ही स्थिती असेल जनतेचे काय?

अजूनही दोन वर्षे बाकी आहेत. पक्षाने अंतर्गत वादाचा उभा केलेला 'बागुलबुवा' आता बाजूला करून जळगाव जिल्ह्याच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यायला हवे. मुख्यमंत्र्यांनीच आता त्याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काळात जनतेच्या दारात जाणाऱ्या कायकर्त्यांना लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देणेही कठीण होईल. एवढे मात्र निश्‍चित!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com