jalgaon loksabha constituency review | Sarkarnama

खासदार ए. टी. पाटलांची हॅटट्रीक विरोधक रोखणार की पक्षातीलच नेते वाट अडविणार?

कैलास शिंदे
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

जळगावचे भाजपच्या ए. टी. पाटील यांनीा दोनदा प्रतिनिधित्व केलंय. या वेळी भाजपमधूनच इच्छुकांची गर्दी आहे. शिवसेनेतर्फेही उमेदवारीसाठी तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीमध्ये मात्र संभ्रम आहे. त्यामुळे कोणत्या पक्षातर्फे कोण रिंगणात उतरणार, यावरच राजकीय गणित अवलंबून असेल. 

जळगाव : गेल्या तीन दशकांपासून 2007 च्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता येथून भाजपचाच उमेदवार विजयी झाला आहे. खासदार ए. टी. पाटील सलग दोनदा विजयी झालेत. त्यांना "हॅट्ट्रिक'ची संधी मिळणार काय, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, त्यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघ यांची नावे चर्चेत आहेत. बांधकाम व्यावसायिक प्रकाश पाटीलही उत्सुक आहेत. मात्र, खासदारांनी उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथे थांबा, महामार्ग चौपदरीकरण यांच्यासह विकासकामांमुळे आपल्याला विजय मिळेल, असा त्यांचा दावा आहे. परंतु, त्यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजी असल्यामुळे यादी जाहीर होईपर्यंत अनिश्‍चिततेचे वातावरण आहे.

भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेतून पाचोऱ्याचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांचीही तयारी आहे. युती झाल्यास मतदारसंघ शिवसेना मागणार काय? हेसुद्धा कोडे आहे. मतदारसंघ मराठा बहुल आहे. आर. ओ. पाटील राजपूत समाजातील आहेत. जातीय समीकरणात मराठा आणि मराठेतर समाजाची मते जमवून यश मिळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असू शकतो. 

आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असला, तरी उमेदवार निश्‍चित नाही. मुंबईतल्या पक्षबैठकीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा झाली. पुढे काय? हे गुलदस्तात आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचीही चर्चा असली, तरी त्यांनी विधानसभेची तयारी चालवली आहे. याशिवाय भाजपत उमेदवारीबाबत काही उलटफेर झाले, तर ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाराही "राष्ट्रवादी'चा उमेदवार असू शकतो. मतदारसंघात नात्यागोत्यावरच निवडणूक लढली गेली आहे. 

 

प्रश्‍न मतदारसंघाचे 

- पाडळसरे, शेळगावसह अनेक महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प अपूर्ण 
- गिरणा नदीवर बलून बंधारे बांधण्याची केवळ चर्चाच 
- वाघूर धरणाचे काम पूर्ण, शेतीपर्यंत पाइपलाइनने पाण्याची प्रतीक्षा 
- विमानतळाचे काम पूर्ण, प्रतीक्षा नियमित हवाई वाहतुकीची 
- तरसोद-फागणे महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेळेत संपवणे 
- जळगावातील चटई, डाळ उद्योग डबघाईस, लघुउद्योग आजारी 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख