भाजपच्या माघारीमुळे जालना जिल्हा परिषद महाविकास आघाडीकडे, दानवेंचा असाही चकवा

भाजपच्या माघारीमुळे जालना जिल्हा परिषद महाविकास आघाडीकडे, दानवेंचा असाही चकवा

औरंगाबाद : जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे भाजपने माघार घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे उत्तम लोखंडे यांची अध्यक्षपदी, तर राष्ट्रवादीचे महेंद्र पवार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. औरंगाबादमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मदत घेऊन उपाध्यक्षपद पदरात पाडून घेतले आहे. जालन्यात मात्र पुन्हा एकदा राजकीय नेत्यांमधील अंडरस्टॅडिंगचा प्रत्यय बिनविरोध निवडीमुळे आला आहे. 

औरंगाबाद जिल्हा परिषदेतील राजकीय नाट्याचे पडसाद उमटत असतांनाच आज जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणुक पार पडली. त्यामुळे जालन्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे महाविकास आघाडीला चकवा देतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण वेगवेळ्या पक्षात असले तरी जालन्यातील राजकीय नेत्यांच्या एकमेकांचा विरोधा हा एका मर्यादेपर्यंत असतो. सत्तेच्या वाटपासाठी मात्र जालन्यातील सर्वपक्षीय नेते एकत्रित निर्णय घेतात याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. 

शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादीचे राजेश टोपे, कॉंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या चर्चेतून अखेर जालना जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष हे दोन्ही बिनविरोध निवडून येण्याचा चमत्कार घडला. जालना आणि औरंगाबाद या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये भाजप हा सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष आहे. पण 2017 च्या अध्यपदाच्या निवडणुकीत तत्त्कालीन शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गोरंट्याल, टोपे यांच्या मदतीने भाजपला सत्तेपासून रोखत अध्यक्षपद पटकावले होते. तर इकडे औरंगाबादेत देखील तत्कालीन कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या सहकार्याने शिवसेनेने अध्यक्षपद मिळवले होते. 

या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये यावेळी भाजपकडून काही तरी चमत्कार घडवला जाईल अशी अपेक्षा होती. राज्यात 105 आमदार असतांना विरोधी पक्षात बसावे लागल्याची सल भाजप नेत्यांच्या मनात असल्यामुळे स्थानिक पदाधिकारी, नेत्यांना देखील काहीही करा पण शिवसेना-महाविकास आघाडीला रोखा असे आदेश देण्यात आले होते. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत हे स्पष्ट झाले. 

जालन्यात भाजप गुपचूप 
जालना जिल्हा परिषदेत भाजपचे सर्वाधिक 22 सदस्य आहेत. शिवसेना 14, राष्ट्रवादी 13, कॉंग्रेस 5 व अपक्ष 2 असे संख्याबळ असल्याने रावसाहेब दानवे व नव्यानेच भाजपचे जिल्हाध्यक्ष झालेले त्यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे हे महाविकास आघाडीला चकवा देतील असे भाकित राजकीय वर्तुळात वर्तवले जात होते. परंतु भाजपने सपशेल माघार घेत ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा करून दिला. भाजपच्या या माघारीकडे देखील रावसाहेब दानवे यांचा चकवा म्हणूनच पाहिले जात आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com