आयुक्तांच्या नियुक्तीचे श्रेय कुणाचे ? जैस्वाल - दानवे समर्थकांमध्ये चढाओढ

....
आयुक्तांच्या नियुक्तीचे श्रेय कुणाचे ? जैस्वाल - दानवे समर्थकांमध्ये चढाओढ

औरंगाबाद : सव्वा महिन्यानंतर औरंगाबाद महापालिकेला आयुक्त मिळाले, पण त्यांची नियुक्ती कुणाच्या पाठपुराव्यामुळे झाली ? यावरून जैस्वाल आणि दानवे समर्थकांमध्ये सोशल मिडियावर चढाओढ सुरू झाली आहे. दोघांच्याही समर्थकांनी पाठपुराव्याच्या पत्राचे छायाचित्र व्हायरल करत श्रेय लाटण्याचे प्रयत्न चालवले आहेत. औरंगाबाद महापालिकेचा कारभार गेल्या महिनाभरापासून पूर्णवेळ आयुक्त नसल्याने ठप्प झाला होता. डॉ. निपूण विनायक विधानसभा निवडणुका होताच प्रदीर्घ रजेवर गेले होते, ते परतत नसल्यामुळे पुर्णवेळ आयुक्त मिळावा यासाठी सत्ताधारी पक्षाकडून प्रयत्न सुरू होते. 

परंतु राज्यात सरकार स्थापन होण्यासाठी झालेला विलंब, दरम्यान लागू झालेली राष्ट्रपती राजवट यामुळे महापालिका आयुक्तांची नियुक्ती रखडली होती. महापौर नंदकुमार घोडेले, विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे तसेच प्रदीप जैस्वाल यांनी देखील महापालिका आयुक्तांच्या नियुक्तीसाठी पाठपुरावा केला होता. राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरू असतांना आमदार दानवे यांनी मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेत त्यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. परंतु राष्ट्रपती राजवट असल्याने राज्यात सरकार स्थापन होईपर्यंत वाट पहा असा सल्ला राज्यपालांनी दानवे यांना दिला होता. 

दरम्यान, राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे सरकार स्थापन होऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. सरकार स्थापन करून विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव संमत होईपर्यंत महाआघाडीच्या आमदारांना मुंबईतच थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मध्यचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी त्यांची भेट घेऊन पुर्णवेळ महापालिका आयुक्त देण्याची मागणी पत्राद्वारे केली. 

विशेष म्हणजे हे पत्र देऊन चार दिवस उलटत नाही तोच, बुधवारी (ता.4) औरंगाबाद महापालिका आयुक्त म्हणून बीडचे जिल्हाधिकारी आस्तीक कुमार पांडेय यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश राज्य शासनाच्या वतीने काढण्यात आले. महापालिकेला पुर्णवेळ आयुक्त मिळाल्यानंतर आता याचे श्रेय कुणाचे, कुणाच्या पाठपुराव्याला यश आले यावरून अंबादास दानवे आणि प्रदीप जैस्वाल समर्थकांमध्ये सोशल मिडियावर चढाओढ सुरू झाली आहे. दोघांच्याही समर्थकांकडून आपल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचा दावा केला जात असल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com