jaisidhheshwar swammys caste certificate invalid | Sarkarnama

सोलापूर लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होणार?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

खासदार महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र अधिकृतरीत्या सक्षम प्राधिकारी कार्यालयातून दिले नसल्याचे व जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे दिसून येत असल्याचा मुद्दा या समितीने आपल्या निष्कर्षात उपस्थित केला आहे. आता या सर्व मुद्द्यांवर खासदार महास्वामी यांना 18 जानेवारीपर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. 

सोलापूर (प्रतिनिधी) : भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांचा बेडा जंगम जातीचा अनुसूचित जातीचा दाखला बनावट असल्याचा अहवाल सोलापूरच्या जात पडताळणी समितीने दिला आहे. याप्रकरणी समितीने खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना नोटीस बजावली असून, येत्या शनिवारपर्यंत (ता. १८) त्यांना म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. 

या प्रक्रियेतून जातीचा दाखला बनावट असल्याचे अंतिमत: सिद्ध झाल्यास डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांचे सदस्यत्व रद्द होवून लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होवू शकते.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी हे भाजपकडून विजयी झाले आहेत. खासदार महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रबद्दल प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे व विनायक कंदकुरे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला आहे. 

नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ ऊर्फ खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार करत याबाबतचे पुरावे ही तक्रारकर्त्यांनी दिले होते. या पुराव्यावर समितीने चौकशी केली आहे. लिंगायत हा पंथ असून अनुसूचित जाती पैकी नाही. बेडा जंगम ही जात लिंगायत पंथ समूहातील नसून वेगळी असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. 15 जानेवारी 1982 रोजी खासदार डॉ. महास्वामी यांनी काढलेल्या बेडा जंगम जातीच्या जात प्रमाणपत्राबाबत दक्षता समितीने सखोल चौकशी केली आहे. 

1982 मधील जात प्रमाणपत्र नोंदणीसाठी दोन रजिस्टर असल्याचे दिसून आले असून, जात प्रमाणपत्र नोंद असलेल्या रजिस्टरमधील नोंदीमध्ये, अक्षरबदल, शिक्का बदल व नोंदी अलीकडच्या काळातील असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले असल्याचा अभिप्राय अहवालात दिला आहे. 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख