Jail Inmates are forced to Purchase Masks | Sarkarnama

कारागृहाचा अजब कारभार; कैद्यांनीच मास्क बनवायचे अन्‌ विकतही घ्यायचे?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी येथील कारागृहाच्या कैद्यांनी पस्तीस हजार मास्क बनवले आहेत. मात्र हे कैदी स्वतः मास्कविना अन्‌ असुरक्षीत वातावरणात काम करत आहेत

नाशिक : 'कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी येथील कारागृहाच्या कैद्यांनी पस्तीस हजार मास्क बनवले आहेत. मात्र हे कैदी स्वतः मास्कविना अन्‌ असुरक्षीत वातावरणात काम करत आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या निषेधार्थ येथील दीड हजार कैद्यांनी काल सायंकाळी अन्नत्याग केला. शासनाच्या सुचनांचे पालन करुन त्यांना पॅरोलवर सोडण्यात यावे अशीही त्यांची मागणी आहे. या अन्नत्यागाने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

यासंदर्भात कारागृह प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी अधिकृतपणे काहीही माहिती सांगण्यास नकार दिला. प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मात्र त्याला अनधिकृतपणे दुजोरा दिला आहे. 'कोरोना'चा धोका लक्षात घेऊन कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी शासनाने विविध सुचना केल्या आहेत. यामध्ये कच्चे व न्याधीन कैदी आणि सात वर्षेपर्यंतची शिक्षा झालेल्या कैद्यांना सहा आठवड्यांच्या पॅरोलवर सोडण्यात यावे, अशा सुचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होत नाही. यासंदर्भात विविध कैद्यांनी प्रशासनाकडे विचारणा केली, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.

या पार्श्‍वभूमीवर मध्यवर्ती कारागृहातील दीड हजार कैद्यांनी कारागृह प्रशासनाच्या हटवादी भूमिकेच्या निषेधार्थ बुधवारी रात्रीचे जेवण नाकारले. अन्नत्याग आंदोलन करीत त्यांनी प्रशासनाविरोधात असहकार आंदोलन पुकारले आहे. जवळपास दीड हजार कैद्यांनी उपोषण सुरु केले आहे. कैद्यांनी रात्रीचे जेवण घेण्यास नकार दिल्याने हे लोण अन्य कैद्यांत पसरण्याचा धोका आहे. सात वर्षाच्या आत ज्या कायद्यांना शिक्षा झाली त्यांना सहा आठवडे पॅरोलवर सोडण्यात येणार असल्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. मात्र प्रशासन कैद्यांना अपेक्षित सहकार्य करत नसल्याची त्यांची तक्रार आहे.

गेल्या आठवड्यात येथील कैद्यांनी पंचवीस हजार व त्यानंतचर दहा हजार असे पस्तीस हजार मास्क तयार केले आहेत. मात्र या कैद्यांना मास्कशिवाय काम कतरावे लागत आहेत. कारागृहात विना मास्क काम करावे लागत असल्याची तक्रार कैद्यांनी चार दिवसांपूर्वीच केली होती. त्यांनी तयार केलेले मास्क कारागृहाच्या कॅन्टीनमध्ये वीस रुपयांना एक या दराने विक्रीस ठेवले आहेत. कैद्यांना मास्क हवा असल्यास त्यांनीच तयार केलेले मास्क त्यांना खरेदी करावे लागतात. त्यामुळे कैदी सुरक्षित नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख