पुन्हा तीच चर्चा : मंत्रिमंडळात संधी कुणाला ? आमदार जगताप, लांडगे की भेगडे?

पिंपरीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात एकालाच संधी मिळाली तर गटबाजी तर उफाळून येणार नाही ना , अशे शंका बहुदा वरिष्ठ नेत्यांना वाटत असावी. शिवाय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकात पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे बळ कोणात आहे या गोष्टीलाही महत्व राहील असे दिसते .
Jagtap Landge Bhegde
Jagtap Landge Bhegde

पिंपरीःभाजपच्या स्थापना दिनानंतर (6 एप्रिल) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे संकेत पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे  या  विस्तारात पिंपरी- चिंचवडचा एक तपाचा मंत्रिपदाचा बॅकलॉग भरून निघणार का हीच उत्सुकता सगळ्या शहराला लागली आहे.

ऐनवेळी जुना व एकनिष्ठतेचा निकष लावल्यास हे मंत्रिपद मावळलाही मिळू शकते. ते कोणालाही मिळो,यानिमित्ताने पुणे जिल्ह्याला मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. ती साधण्यासाठी या तिन्ही आमदारांनी कंबर कसली आहे. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत होणाऱ्या मेळाव्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची संधी त्यांना आयती चालून आली आहे. त्याचा ते कसा लाभ उठवितात आणि तो त्यांना हात देतो का हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीची 15 वर्षाची सत्ता घालविण्यात सिंहाचा वाटा असलेले शहरातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांची नावे विस्तारात घेतली जात आहे. लांडगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहेत. मात्र, ते पहिल्यांदाच आमदार झाले असून त्यात ते पक्षाचे सहयोगी आमदार आहेत.हीच अडचण त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवू शकते.असा राजकीय जाणकारांचा होरा आहे.

तर जगताप यांची आमदारकीची ही दुसरी टर्म असल्याने अनुभवाच्या जोरावर त्यांना मंत्रिपद मिळू शकते, असा अंदाज आहे. मात्र, हे दोघेही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आहेत. त्यांच्या तुलनेत दोनदा मावळमधून निवडून आलेले तरुण तडफदार आमदार बाळा भेगडे यांचाही विचार या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणून होऊ शकतो. जगताप यांनी अखेरच्या दोन महिन्यांसाठी का होईना पिंपरी-चिंचवडला मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, असे जाहीर भाकीत नुकतेच केले आहे.ते खरे ठरते का ते आता काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला साडेतीन वर्ष पूर्ण झाले आहेत. या अगोदरही मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेकदा वावड्या उठल्या होत्या. परंतु, प्रत्येकवेळी कोणत्यातरी कारणावरून मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडत होता. नुकताच तो नारायण राणे प्रकरणामुळे रखडला होता. आता त्यांचे पुनर्वसन झाल्याने पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचे दार किलकिले झाले आहे.

पालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यास शहराला 'लाल' दिवा जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. ज्या आमदाराचे जास्त समर्थक नगरसेवक निवडून येतील त्या आमदाराला मंत्रिपद दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले होते. महापालिका निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. तेव्हापासून जगताप आणि लांडगे यांना मंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत. मात्र, दोन्ही आमदारांनी आपलेच नगरसेवक अधिक निवडून आल्याचा दावा केल्याने कुणाला मंत्रिपद द्यायचे हा तिढा पहिल्याच पायरीवर निर्माण झाला होता. नंतर या ना त्या कारणाने हा विस्तार लांबतच गेला होता.

पिंपरीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात एकालाच संधी मिळाली तर गटबाजी तर उफाळून येणार नाही ना , अशे शंका बहुदा वरिष्ठ नेत्यांना वाटत असावी. शिवाय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकात पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे बळ  कोणात आहे या गोष्टीलाही महत्व राहील असे दिसते . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com