रास्ता रोको करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांना अटक

  रास्ता रोको करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांना अटक

औरंगाबाद : शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याचे पैसे मिळावेत, कन्नड तालुक्‍यातील हतनूर येथील पुलाची उंची वाढवावी यासह इतर मागण्यासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शेतकऱ्यांसोबत रास्तारोको आंदोलन सुरू केले होते. प्रशासनाकडून लेखी आश्‍वासन मिळाल्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका घेत जाधव व अन्य आंदोलकांनी सोलापूर-धुळे मार्ग रोखून धरला. 

पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तीन तास झाले तरी रास्तारोको संपत नाही हे लक्षात आल्यावर मात्र हर्षवर्धन जाधव व इतरांना पोलिसांनी अटक केली. जिल्हाभरात सध्या पीक विम्याच्या प्रश्‍न गाजतो आहे. शिवसेनेने तर राज्यभरात पीक विमा मदत केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. शेतकऱ्यांना नडाल तर मुंबईतील कार्यालये बंद करू असा सज्जड दम देखील पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नुकताच भरला होता. 

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देखील आता या प्रश्‍नात उडी घेतली आहे. कन्नड तालुक्‍यातील चिकलठाण मंडळासह काही गावांमधील शेतकऱ्यांना विमा नाकारण्यात आला आहे. त्यासाठी पीक कापणी अहवालानुसार तुमच्या भागात नुकसानच झालेले नाही असे नमूद करण्यात आल्याचा हवाला विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना दिला जात आहे. 

शेतकऱ्यांची होणारी ही फसवणूक पाहता हर्षवर्धन जाधव यांनी आज रास्तारोको आंदोलन करत सोलापूर-धुळे महामार्गावर ठिय्या दिला. सकाळी अकरा वाजता जाधव आपल्या समर्थक व शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरले आणि पीक विम्याचे पैसे आणि तालुक्‍यातील हतनूर येथील पुलाची उंची वाढवण्याचे लेखी आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत जागचा हलणार नाही अशा इशारा दिला. 

नुकसान झाले नाही असे नमूद करणाऱ्या पीक कापणीच्या अहवालावरून पीक विमा नाकारणाऱ्या विमा कंपन्यांना जाधव यांनी चांगलेच फटकारले. पीक कापणी अहवालानूसार जर या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसेल तर मग सरकारने काढलेली आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी कशी आली असा सवाल देखील उपस्थित केला. 

त्यामुळे पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्याची लेखी हमी द्यावी, तसेच हतनूर येथील उड्डाणपूलाची उंची वाढवावी या संदर्भातही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय रास्तारोको आंदोलन मागे घेणार नाही असे जाधव यांनी बजावले. शेतकरी आणि आंदोलकही जागचे हलायला तयार नसल्यामुळे सोलापूर-धुळे मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे अखेर पोलीसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यासह आंदोलकांना अतिरिक्त पोलीस बळ मागवून अटक केली. त्यानंतर सोलापूर-धुळे मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com