कॉंग्रेसची उमेदवारी नाही मिळाली ते बरेच झाले; आता मोदींना पाठिंबा देणार - हर्षवर्धन जाधव

 कॉंग्रेसची उमेदवारी नाही मिळाली ते बरेच झाले; आता मोदींना पाठिंबा देणार - हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा शिवसेनेला होऊ नये म्हणून मी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा प्रस्ताव स्वीकारला होता. पण सुदैवाने मला उमेदवारी मिळाली नाही हे बरेच झाले. कारण केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण जाहीर केले, तेव्हा सर्वप्रथम मी पंतप्रधान मोंदीचे अभिनंदन केले होते. कॉंग्रेसकडून लढलो असतो तर मला राहुल गांधीच्या शेजारी बसावे लागले असते. परंतु आता माझा मार्ग मोकळा झाला असून मी माझ्या पक्षाकडूनच निवडणूक लढणार आणि मोदींना पाठिंबा देणार असे शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे लोकसभा उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी सरकारनामाशी बोलतांना स्पष्ट केले. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे कन्नड-सोयगांव मतदारसंघाचे विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काल अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मध्यंतरी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचे प्रयत्न त्यांनी स्थानिक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्या मदतीने सुरू केले होते. पण कॉंग्रेसने आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारत अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. तर हर्षवर्धन जाधव यांनी आपल्याच शिवस्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे सांगून कॉंग्रेसकडून निवडणूक लढवण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. 

या संदर्भात भूमिका स्पष्ट करतांना हर्षवर्धन जाधव म्हणाले, केवळ मतांचे विभाजन टाळण्यासाठी मी कॉंग्रेसचा पर्याय स्वीकारला होता. पण माझ्यासाठी आता तो विषय संपला आहे. अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जरी कॉंग्रसने मला उमेदवारी देऊ केली तरी माझा निर्णय आता झाला आहे. मी माझ्याच पक्षाकडून निवडणूक लढवणार. नव्हे मी कालच माझा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखलही केला आहे. औरंगाबाद लोकसभेची निवडणूक आता शिवसेनेचे चंद्रकांत खैरे विरुध्द मतदारसंघातील सर्वसामान्य अशी झाली आहे. लोकांना बदल हवा आहे आणि सुशिक्षित जातीपातीच्या राजकारणापलीकडे विचार करणारा उमेदवार म्हणून ते माझ्याकडे पाहतात. शहरी आणि ग्रामीण भागात विद्यमान खासदारांच्या विरोधात रोष आहे, तो पदोपदी जाणवतो. त्यामुळे नव्या पर्यायाच्या शोधात असणाऱ्या मतदारांचा शोध माझ्याजवळ येऊन संपतो असा दावा देखील जाधव यांनी केला. 
एमआयएमचा उमेदवार खैरेंमुळेच.. 
कॉंग्रेस, एमआयएम आणि अब्दुल सत्तार यांच्या उमेदवारीमुळे मतांच्या विभाजनाचा फटका तुम्हाला बसणार नाही का ? या प्रश्‍नावर दर निवडणुकीत होते तसे यावेळी होणार नाही. एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची उमेदवारीच मुळात खैरेंमुळे आहे असा दावा करतांना अनेक मुस्लिम मतदार माझ्या सोबत असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. एमआयएमचे शिवसेनेशी असलेलं साटलोटे लोक चांगलेच ओळखतात. त्यामुळे मुस्लिम, दलित समाज यावेळी भूलथापांना बळी पडणार नाही. 

चंद्रकांत खैरे यांना कन्नड या माझ्या मतदारसंघातून दरवेळी मताधिक्‍य मिळत आले आहे. पण आता त्यांच्या पक्षाचा आमदारच निवडणूक लढवणार आहे म्हटल्यावर तालुक्‍यातील मतदार त्यांना मतदान कसे करतील. माझ्या मतदारसंघात मी खैरेंना निश्‍चितच मोठा फटका देईल. त्यामुळे कॉंग्रेस, एमआयएम, अपक्ष उमेदवार जरी रिंगणात असले तरी खरी लढत माझ्यात आणि शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्यात होणार असल्याचा दावा देखील हर्षवर्धन जाधव यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com