हर्षवर्धन जाधव कृष्णकुंजवर, मनसेच्या अधिवेशनात प्रवेश शक्‍य ?

हर्षवर्धन जाधव कृष्णकुंजवर, मनसेच्या अधिवेशनात प्रवेश शक्‍य ?

औरंगाबाद : पूर्वाश्रमीचे मनसे आमदार व नुकतेच शिवसेनेला जय महाराष्ट्र करून बाहेर पडलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. येत्या 23 जानेवारी रोजी मुंबईत मनसेचे अधिवेशन होत असून पक्ष नव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात ताकदीनीशी उतरण्याच्या तयारीत आहे. अशावेळी हर्षवर्धन जाधव यांना पुन्हा ज्या पक्षाने पहिल्यांदा आपल्याला आमदार केले त्या मनसेची आठवण झाली आहे. मनसे सोबत आपल्या पुन्हा काम करण्याची इच्छा जाधव यांनी राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती आहे. 

कन्नड विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव झाल्यापासून जाधव हे राजकारणापासून अलिप्त होते. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती सभापती निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या सदस्यांना फोडत भाजपने आपला सभापती आणि उपसभापती केला. यावरून सध्या जाधव यांनी आपले सासरे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरच आरोप करत खळबळ उडवून दिली होती. वर्तमान पत्रांमधून जाहिरात देऊनच जाधव यांनी आपल्याला संपवण्याचा सासऱ्यांचा कसा डाव आहे याची माहिती दिली होती. 

जिल्हा परिषदेचे सदस्य असलेल्या हर्षवर्धन जाधव यांना 2009 मध्ये सर्वप्रथम आमदार होण्याची संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच मिळाली होती. परंतु आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या औरंगाबाद दौऱ्यात ताफ्यात घुसखोरी करत गाडी घुसवल्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावेळी हर्षवर्धन जाधव यांची बाजू घेत औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सरकारच्या निषेधार्थ सभा घेत " मौका सब को मिलता है' अशा शब्दांत तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. परंतु पक्षाने आपल्याला वाऱ्यावर सोडले असा आरोप करत हर्षवर्धन जाधव यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत 2014 ची विधानसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती. 

परंतु कुठल्याही पक्षात पाच वर्षापेक्षा जास्त काळ न थांबण्याची जाधव यांची परंपरा इथेही कायम राहिली. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी वाद, आरोप-प्रत्यारोप करत हर्षवर्धन जाधव यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेला जयमहाराष्ट्र केला. दरम्यान, त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभाग नोंदवत शिवसेनेच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला मराठा आरक्षणावर बोलू नका असे सांगितल्याचा आरोप देखील जाधव यांनी जाहीरपणे केला होता. एवढेच नाही तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारा विरुध्द लढत शिवसेनेच्या पराभवाला देखील जाधव हेच कारणीभूत ठरले होते. स्वतःचा शिवस्वराज्य बहुजन पक्ष काढत त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची देखील घोषणा केली होती. 

परंतु कन्नड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून जाधव यांनाच तगडे आव्हान मिळाल्यामुळे त्यांनी सगळी शक्ती पणाला लावली होती. परंतु लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या पराभवाला जाधव हेच जबाबदार असल्याची चर्चा झाल्यामुळे कन्नडमध्ये हर्षवर्धन जाधव यांचा पराभव झाला. तेव्हापासून हर्षवर्धन जाधव हे राजकारणापासून दूर होते. गेल्या महिन्या दोन-महिन्यात ते प्रसार माध्यमांशी देखील बोलले नव्हते. त्यांच्याबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा देखील सुरू होत्या. 

राज ठाकरेंकडून शब्द नाही... 
हर्षवर्धन जाधव हे पाच वर्ष मनसेमध्ये होते. त्यामुळे त्यांच्या लहरीपणाचा अनुभव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अनुभवलेला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कालांतराने जाधव यांनी त्याच पक्षातील राज्य व स्थानिक नेत्यांबद्दल उघडलेली मोहिम, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात घेतलेली भूमिका, आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा मनसे सोबत जाण्याची व्यक्त केलेली इच्छा या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे यांनी जाधव यांना भेट दिली असली तरी पक्ष प्रवेशाबद्दल अद्याप हिरवा कंदील दाखवलेला नाही. 

मनसेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार मुंबईत 23 जानेवारी रोजी होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, नेत्यांचा मनसेत प्रवेश होणार आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. कदाचित याच वेळी हर्षवर्धन जाधव यांची देखील मनसेत घरवापसी होऊ शकते. अर्थात अंतिम निर्णय राज ठाकरे हेच घेतील असेही सांगण्यात येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com