इम्तियाज जलील यांच्या विजयाने अपक्ष जाधवांनाच " हर्ष'

इम्तियाज जलील यांच्या विजयाने अपक्ष जाधवांनाच " हर्ष'

औरंगाबाद : शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाने शहरात सन्नाटा पसरला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या पराभवला जबाबदार ठरलेले आणि स्वतःही पराभूत झालेले अपक्ष हर्षवर्धन जाधव यांना मात्र चांगलाच हर्ष झाला. आपण पराभूत होणार याचा अंदाज असतांनाही शेवटपर्यंत हर्षवर्धन जाधव आपले पुत्र आदित्यवर्धन यांच्यासोबत मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून बसले होते. 

इम्तियाज जलील यांचा विजय निश्‍चित होताच ही गोड बातमी प्रसारमाध्यमांना सर्वप्रथम हर्षवर्धन जाधव यांनीच दिली. इम्तियाज यांना शुभेच्छा देण्यासाठी जाधव पितापुत्र थांबून होते. अखेर मतमोजणी केंदातून बाहेर येताच इम्तियाज - जाधव यांनी एकमेकांना टाळी आणि अलिंगन देत विजयाच्या शुभेच्छा दिल्या. एमआयएमच्या विजयाने जाधवांना झालेला हर्ष पाहून उपस्थितांनी मात्र आश्‍चर्य व्यक्त केले. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांना सर्वप्रथम आपल्या संपर्क कार्यालयात बोलावून पाठिंबा देण्याची विनंती केली होती. शिवजयंती मिरवणूकीत सहभागी होऊन शहरात हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक दिसावे या जाधव यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत इम्तियाज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र सुरूवातीला लोकसभा लढवायची की नाही ? या विचारात असलेल्या एमआयएमने निवडणुका जवळ येताच मात्र शड्डू ठोकून मैदानात उतरण्याची तयारी केली आणि अखेर मैदान मारले. 

इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर जाधव यांनी त्यांच्यापासून अंतर राखायला सुरूवात केली होती. अगदी निवडणुक प्रचारा दरम्यान, एमआयएमच्या एका कार्यकर्त्यांच्या व्हिडिओवरून जाधव यांनी इम्तियाज जलील यांच्यावर तोंडसुख घेत त्यांचे कार्यालय फोडण्याची भाषा देखील केली होती. परंतु प्रत्यक्षात मतदान आणि मतमोजणीनंतर हर्षवर्धन जाधव आणि इम्तियाज जलील यांच्यात कुठलाच दुरावा नव्हता हे दिसून आले. मतमोजणी केंद्रावर इम्तियाज जलील यांच्या विजयाची वाट पाहत ठाण मांडून बसलेले हर्षवर्धन सतत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना इम्तियाज हेच विजयी होतील असे सांगत होते. इम्तियाज जलील विजयी झाल्यानंतर हर्षवर्धन व त्यांचे पुत्र आदित्यवर्धन यांनी त्यांची गळाभेट घेत विजयाच्या शुभेच्छा दिल्या. 

एकमेकांना टाळी आणि अलिंगन देत ज्या पध्दतीने हे दोन उमेदवार भेटले ते पाहून उपस्थितांना पडद्यामागे काय घडले असेल याचा अंदाज निश्‍चितच आला असावा. हर्षवर्धन जाधव यांनी 2 लाख 80 हजारांहून अधिक मते घेत इम्तियाज यांच्या विजयाचा मार्ग सुकर करून दिला. अटीतटीच्या लढतीत इम्तियाज जलील साडेचार हजार मतांनी विजयी झाले. त्यामुळे या विजयात हर्षवर्धन जाधव यांची भूमिका किती महत्वाची ठरली हे लक्षात आल्यानेच इम्तियाज यांनी हर्षवर्धन जाधव यांना "जादू की झप्पी' देत त्यांना शुक्रिया अदा केल्याची जोरदार चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com