मॅच कुणीही जिंकू द्या, मॅन ऑफ दी मॅच मीच - हर्षवर्धन जाधव

 मॅच कुणीही जिंकू द्या, मॅन ऑफ दी मॅच मीच - हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : जिंकायच्या उद्देशानेच मी निवडणूक लढलो होतो, पण कमी वेळात देखील मला मिळालेली मते हा माझा विजयच मी समजतो. मॅच कुणीही जिंकू द्या, मॅन ऑफ दी मॅच आणि मॅन ऑफ दी सिरीज मीच होतो असा दावा अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी पराभवानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला. खैरेंच्या पराभवाला तुम्हाला जबाबदार धरले जाईल का? या प्रश्‍नावर खैरेंचा पराभव माझ्यामुळे झालेला नाहीतर तो जनतेने केला आहे. कुणाला निवडूण द्यायचे आणि पाडायचे हा जनतेचा अधिकार आहे, तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही असा टोला देखील जाधव यांनी यावेळी लगावला. 

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत खैरे यांच्या पराभवाला हर्षवर्धन जाधव हेच जबादार असल्याची चर्चा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. इम्तियाज जलील आणि खैरे यांच्यातील मतांचे अंतर पाहता ते स्पष्ट देखील होते. परंतु आपल्यावरील हा आरोप चुकीची असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल करत हर्षवर्धन जाधव यांनी रंगत आणली होती. त्यांना 2 लाख 82 हजार इतकी मते मिळाली. मोठ्या प्रमाणात मत विभागणी झाल्याचा फटकाच खैरे यांना बसल्याचे यावरून स्पष्ट झाले. त्यामुळे सहाजिकच खैरेंच्या पराभवाला जाधव यांना जबाबदार धरले जात आहे. 

मात्र हा आरोप फेटाळून लावतांना हर्षवर्धन जाधव म्हणाले, मी जिंकण्यासाठीच लढलो होतो. पण प्रचारासाठी मला अगदी कमी वेळ मिळाला, त्यातही मी मतदारांपर्यत पोचण्याचा प्रयत्न केला. त्यात मी बऱ्यापैकी यशस्वी देखील झालो हे मला मिळालेल्या मतांवरून स्पष्ट होते. राहिला प्रश्‍न मी पराभूत होण्याचा आणि खैरेंच्या पराभवाला जबादार असण्याचा, तर माझ्यामुळे खैरे साहेंबाचा पराभव झालेला नाही, तो जनतेने केला आहे. तो जनतेचा अधिकार आहे आणि तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही. 

मी विधानसभा लढवणार.. 
लोकसभा निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर आता कन्नडची विधानसभा लढवणार का? या प्रश्‍नावर देखील निश्‍चित लढवणार असे जाधव यांनी सांगितले. याशिवाय जिल्ह्यात जिथे जिथे शक्‍य असेल तिथे योग्य उमेदवार मिळाल्यास आपण तिथेही निवडणूक लढवू असे त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com