याला म्हणतात राजकारण : दुपारी अजितदादांसोबत; रात्री फडणविसांची संगत

याला म्हणतात राजकारण : दुपारी अजितदादांसोबत; रात्री फडणविसांची संगत

पुणे : राजकारणात कधी काहीही घडू शकते, याचा प्रत्यय सोमवारी पुण्यात आला. वडगाव शेरी मतदारसंघातील समीकरणे इतक्या वेगाने बदलली की कोण कोणत्या पक्षात आहे याचा उलगडा रात्री उशिरापर्यंत होत नव्हता. 

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी आमदार बापू पठारे यांनी पक्ष सोडून थेट भाजपमध्ये उडी मारल्याने त्यांच्याही समर्थकांचा गोंधळ उडाला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार काल दुपारी वडगाव शेरीत होते. पठारे व त्यांचे समर्थक अजितदादांसोबत राष्ट्रवादीचा प्रचार करत होते. घड्याळ सर्वत्र पोहोचवत होेते.

अजितदादा रॅली करून निघून गेले आणि त्यानंतर सूत्रे फिरू लागली. रॅली दरम्यान अजितदादा आणि पठारे यांच्यात धुसफुस झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पठारे नाराज झाले. त्यांनी थेट भाजपच्या नेत्यांना फोनाफोनी सुरू केली. संघाचे काही वरिष्ठ हे पठारे यांच्या आधीपासून संपर्कात होते. पठारे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही या आधी पक्षांतराच्या विषयाबाबत बोलले होते. भाजपचे स्थानिक आमदार जगदिश मुळीक यांच्यासाठी तर पठारे यांचा प्रवेश म्हणजे विधानसभा निवडणुकीचे गणित सोपे करण्याचा मार्ग होता. त्यामुळे त्यांनीही फार विरोध केला नाही. स्थानिक भाजप नेत्यांचा ग्रीन सिग्नल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीच प्रवेश करण्याचे ठरविण्यात आले. 

त्यानंतर मुळीक हे आपल्या प्रचाराची रॅली अर्धवट सोडून मुंबईकडे निघाले. वाटेत पठारे यांना सोबत घेतले. दोघे एकाच गाडीने मग मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. रात्री साडे बाराच्या सुमारास पठारेंचा पक्षप्रवेश झाला. मुळीक आणि पठारे हे एकमेकांशी बोलतही नव्हते. बोलले तर एकमेकांवर टीकाच करायचे. आता दोघेही एकत्र आल्याने दोघांच्या समर्थकांचा मात्र गोंधळ उडाला.

पठारे यांना विरोध करणारे काहीजण या आधी मुळीक यांना मिळाले होते. त्यांची मात्र पठारे यांच्या भाजप प्रवेशाने अडचण झाली आहे. राष्ट्रवादीने वडगाव शेरीत नेटाने लढण्याचा निर्धार केला असला तरी बडा मोहोरा भाजपच्या गळाला लागल्याने त्याचा परिणाम झाला आहे. या साऱ्या परिस्थितीत आगामी काळात भाजप मजबूत होणार असला तरी पक्षांतर्गत संघर्षही तीव्र झाल्यास आश्चर्य नको.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com