It is not known how many factories Ajit Pawar has, says chandrakant patil | Sarkarnama

अजित पवार यांचे तर किती कारखाने आहेत, हे माहीतही नाही..: चंद्रकांतदादांचा टोला

ज्ञानेश सावंत
बुधवार, 29 जानेवारी 2020

...

पुणे :  राज्य सरकारमधील सगळेच मंत्री कारखानदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तर किती कारखाने आहेत, हे माहीतही नाही. ते गिरीश बापट यांना सांगता येईल. दुसरे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे तर पवारांपेक्षाही अधिक कारखाने असतील. पाटील हे सर्वांत हुशार मंत्री असून, आपल्याकडे काही नसल्याचे दाखवतात, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार, पाटील यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांवर बोचरी टीका केली. भाजपविरोधात एकत्र येण्याचा राजकीय प्रयोग पुण्यातही होऊ शकतो, याकडे पाटील यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

पक्षाच्या संघटन पर्व कार्यक्रमात पाटील बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, संजय काकडे, भाजपचे नवे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, माजी मंत्री बाळा भेगडे, दिलीप कांबळे, योगेश गोगावले यांच्यासह पक्षाचे आमदार-पदाधिकारी उपस्थित होते. 

भाजपचे सरकार असताना तेव्हाचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मला मंत्री करायचे ठरविले तेव्हा, साधे खाते देण्याचा माझा आग्रह होता; मात्र, माझा कारखाना, संस्था, नसल्याने त्यांनी सहकार खात्याची जबाबदारी सोपविल्याचे सांगत, पाटील यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्र्यांपासून सगळेच मंत्री "कारखानदार असल्याचा पाढाच वाचून दाखविला.

पाटील म्हणाले, ""राज्यातील 23 महापालिकांत भाजपची ताकद आहे. येथील सर्व आमदार, नगरसेवक सहज निवडून येऊ शकतात. या शहरांमधील संघटनात्मक कामामुळे देश, राज्यात सराकर येऊ शकते. त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. पक्षाचा नवा प्रदेशाध्यक्ष येत्या 16 फुेब्रवारीला जाहीर होईल. '' 

पाटील म्हणाले, ""जिल्हा बॅंकांच्या निवडणुका पुढे का ढकल्या आहेत. हे लोकांना कळते आहे. नगराध्यक्ष, सरपंचाची थेट निवड रद्द करून या सरकारने लोकशाही संपविण्याचा प्रयत्न केला आहे. '' 

घरात भांडणे असू शकतो, पण ती बाहेर जायला नको आहेत, इतरांच्या मदतीने घरात भांडे होतील, याचा कोणी प्रयत्न करीत नाही, असे सूचक विधान करीत पाटील यांनी पक्षात गटतट नको, असे सांगत गटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दम भरला. याआधीच्य निवडणुकीत आपण कोणाचे काम केले ? आपल्याच लोकांना पराभूत केले का ? याचा जाब मी विचारणार नाही, मात्र, त्याचा विचार प्रत्येकाने शांतपणे करावा, असा सल्लाही पाटील यांनी दिला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख