फडणवीसांच्या दत्तक नाशिकचे प्रश्‍न पोहोचले मुख्यमंत्री ठाकरेंच्या दरबारी!

शहराच्या पायाभूत सुविधा, तसेच महापालिकेसंदर्भातील प्रश्‍न तातडीने सोडवून नाशिकच्या विकासाला चालना मिळावी म्हणून शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. महापालिकेचा आकृतिबंध मंजूर करण्यापासून तर स्मार्टसिटीअंतर्गत काही प्रकल्पांना विरोध केला जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

नाशिक  ः शहराच्या पायाभूत सुविधा, तसेच महापालिकेसंदर्भातील प्रश्‍न तातडीने सोडवून नाशिकच्या विकासाला चालना मिळावी म्हणून शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. महापालिकेचा आकृतिबंध मंजूर करण्यापासून तर स्मार्टसिटीअंतर्गत काही प्रकल्पांना विरोध केला जाणार आहे.

पाच वर्षांत राज्यात भाजप व शिवसेना युतीचे सरकार असले, तरी शिवसेनेला मात्र चमकदार कामगिरी दाखविता आली नाही. त्यामुळे यंदाच्या पंचवार्षिकमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांमध्ये हुरूप आला आहे. सत्तेच्या माध्यमातून नाशिककरांचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी हीच संधी असल्याने नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले खरे; परंतु नवीन प्रकल्प तर सोडाच नाशिक शहरासंदर्भात महत्त्वाचे प्रश्‍न अद्याप शासनदरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळे नाशिकसंदर्भातील प्रश्‍नांची तड लावण्यासाठी भेट घेणार असल्याचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले. सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, गटनेते विलास शिंदे, प्रवीण तिदमे, डी. जी. सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख नगरसेवकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेईल.

एकीकृत विकास नियंत्रण नियमावली मंजूर करण्याऐवजी नाशिकसाठी लागू केलेल्या विकास नियंत्रण नियमावलीतून पार्किंगबाबतचा नाशिकवर झालेला अन्याय दूर करण्याची मागणी केली जाणार आहे. त्याशिवाय टायरबेस मेट्रो, शहर बससेवा यांसारख्या योजना नाशिकला आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे या प्रकल्पांची व्यवहार्यता तपासून निर्णय घ्यावा, स्मार्ट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळत असल्याने चौकशी करावी, स्मार्ट प्रकल्पांची व्यवहार्यता तपासावी, महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला महापालिकेतर्फे जागा देताना दर कमी का लावले आदींबाबत चौकशीची मागणी केली जाणार आहे.

शहरातील प्रमुख प्रश्‍नांत, महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, आकृतिबंध मंजूर करावा, महापालिकेतील रिक्त पदे भरण्यास मान्यता द्यावी, विकास नियंत्रण नियमावलीतील पार्किंगचा नियम दूर करावा, पाणीपुरवठा व मलनिस्सारण व्यवस्थेसाठी निधी द्यावा, गावठाण क्‍लस्टर योजना मंजूर करावी यांचा समावेष आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com