इस्लामपूर : जयंत पाटलांनी विरोधकांचा केला ' करेक्‍ट कार्यक्रम'

ही निवडणूक वाळवा तालुक्‍यातील जयंत पाटील यांच्या विरोधकांना त्यांची ताकद दाखविणारी, तर जयंत पाटलांना आत्मविश्‍वास देणारी ठरली.
jayant Patil
jayant Patil

इस्लामपूर  : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांचा "करेक्‍ट कार्यक्रम' करीत परत एकदा मतदारसंघावरील आपली घट्ट पकड दाखवून दिली आहे. जयंत पाटील हे 72 हजार 169 मताधिक्‍याने निवडून आल्याने त्यांना घाम फोडण्याचे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.

  गौरव नायकवडी यांना पुढे करून निशिकांत पाटील यांचे पंख कापणाऱ्या सदाभाऊ खोत, आनंदराव पवार, विक्रम पाटील व राहुल महाडिक यांचा करिश्‍मा दिसला नाही. अगदी इस्लामपूर शहरातही ते जयंत पाटील व निशिकांत पाटील यांच्यापासून मताधिक्‍यात लांब राहिले. एकटे लढूनही निशिकांत पाटलांनी आपली चर्चा मतदारसंघात कायम ठेवत 'पडला कसा, यापेक्षा लढला कसा' हे दाखवून दिले.  

या मतदारसंघात "राष्ट्रवादी'कडून जयंत पाटील, अपक्ष निशिकांत पाटील व शिवसेनेचे गौरव नायकवडी यांच्यात तिरंगी लढत झाली. या लढतीत जयंत पाटील यांचा विजय तसा निश्‍चितच होता. आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासून शेवटच्या फेरीपर्यंत जयंत पाटील यांनी विरोधी उमेदवारांवर मताधिक्‍य घेण्याचा क्रम चढता ठेवला. 

काही ठिकाणी निशिकांत पाटील दुसऱ्या क्रमांकाला, तर काही ठिकाणी गौरव नायकवडी दुसऱ्या क्रमांकाला अशी स्पर्धा झाली. निशिकांत पाटील यांना इस्लामपूर शहरासह आष्टा व मिरज तालुक्‍यातील गावांमध्ये मताधिक्‍य मिळेल व ते विजयापर्यंत पोचतील, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला होता. मात्र, इस्लामपूर शहरातच जयंत पाटील यांनी 11 हजार 146 मताधिक्‍य घेऊन निशिकांत पाटील यांचे मनसुबे धुळीस मिळविले. 

फक्त वाळवा गावात गौरव नायकवडी यांनी जयंत पाटील यांच्यापेक्षा मताधिक्‍य घेतले. त्यामुळे जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात एकछत्री अंमल दाखवून दिला. सहकारी संस्थांचे जाळे व गावोगाव असणारे कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन यामुळे जयंत पाटील यांना मोठे मताधिक्‍य मिळाले. 

नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मताधिक्‍य कमी घेतले, मात्र मतदारसंघात निवडणूक उभी करण्यासाठी त्यांची उमेदवारी कारणीभूत ठरली. तालुक्‍यात निशिकांत पाटील यांचा गावोगाव स्वतःचा गट निर्माण झाला, तर गौरव नायकवडी यांनी नायकवडी कुटुंबाने आजवर तालुक्‍याच्या राजकारणात स्वतःभोवती घातलेले कुंपण तोडून नवे युवा नेतृत्व म्हणून एक पाऊल पुढे टाकले. ही निवडणूक वाळवा तालुक्‍यातील जयंत पाटील यांच्या विरोधकांना त्यांची ताकद दाखविणारी, तर जयंत पाटलांना आत्मविश्‍वास देणारी ठरली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com